खंडणीचा पैसा लष्कराला नको!
By admin | Published: October 24, 2016 05:36 AM2016-10-24T05:36:15+5:302016-10-24T05:36:15+5:30
‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला पाच कोटी रुपये द्यावेत, ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अट निर्मात्यांनी मान्य केली असली
नवी दिल्ली/ पणजी : ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला पाच कोटी रुपये द्यावेत, ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अट निर्मात्यांनी मान्य केली असली, तरी असा बळजबरीचा निधी घेण्यास लष्कराने साफ नकार दिला आहे. दुसरीकडे, अशा खंडणी म्हणून वसूल केलेल्या पैशातून लष्कराला मदतीची गरज नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला. ते रविवारी गोव्यात पत्रकारांशी बोलत होते.
पाक कलावंतांची भूमिका असल्याच्या कारणावरून मनसेने ‘ए दिल है मुश्कील’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मध्यस्थी केल्यानंतर मनसेने तलवार म्यान केली. यापुढे पाक कलाकारांना चित्रपटात काम न देता, सैनिक कल्याण निधीमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपये द्यावेत, ही राज यांची अट निर्मात्यांनी मान्य केली. मात्र, अशा प्रकारे धमकावून उकळलेले पैसे स्वीकारण्यास सैन्याने नकार दिल्याचे कळते.
लष्कराला राजकारणामध्ये ओढू नका. लष्कर धर्मनिरपेक्ष आहे. बळजबरीने नव्हे, तर स्वेच्छेने दिलेला निधीच स्वीकारतो, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना माजी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस. जयस्वाल म्हणाले, ‘आर्मी भीक दिलेला पैसा घेत नाही. जर निर्मात्यांना दान देण्याची इच्छा असेल, तर त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे स्वेच्छेने द्यावे.’