तीन पिढ्या सैन्यात; आजोबा सुभेदार, वडील सैन्य प्रशिक्षक, आता मुलगा बनला अधिकारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 02:37 PM2023-06-11T14:37:47+5:302023-06-11T14:46:57+5:30
Passing out Parade Result 2023: विशेष म्हणजे, गगनज्योत सिंगला IMA मध्ये त्याच्या वडिलांनीच ट्रेनिंग दिली.
Passing out Parade Result 2023: सैन्यात भरती होणे, अनेकांचे स्वप्न असते. दरवर्षी शेकडो उमेदवार सैन्यात भरती होतात. काहींच्या तर दोन किंवा तीन पिढ्याने सैन्यात सेवा दिली आहे. हरियाणातून असेच एक उदाहरण समोर आले आहे. हरियाणातील एका कुटुंबातून तिसरी पिढी सैन्यात भरती झाली आहे.
Three generations of soldiers!
— Lt Gen Satish Dua 🇮🇳 (@TheSatishDua) June 11, 2023
Lt Gagan Jot Singh trained by his instructor father, Subedar Major Gurdev Singh, commissioned at Indian Military Academy yesterday. Grandfather was also a retired Subedar.
The tradition of soldiering runs deep in India.
Jai Hind 🇮🇳 pic.twitter.com/WNGuk2fWAx
हरियाणाच्या अंबालाचा रहिवासी असलेला गगनज्योत सिंग आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर अधिकारी झाला. विशेष म्हणजे, त्याला प्रशिक्षण देणारे, दुसरे-तिसरे कोणी नसून त्याचेच वडील सुभेदार मेजर गुरदेव सिंग होते. आपल्या मुलाच्या यशाबद्दल 51 वर्षीय गुरदेव सिंग म्हणाले की, माझा मुलगा आता लेफ्टनंट झाला, याचा मला अभिमान आहे. गगनज्योत सिंगला सैन्यात भरती होण्याची प्रेरणा वडील आणि आजोबांकडून मिळाली. गगनचे आजोबा अजित सिंगदेखील सुभेदार म्हणून निवृत्त झाले.
1947 च्या फाळणीवेळी भारतात आले
गगनज्योत सिंगची कथा लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्याचे आजोबा निवृत्त सुभेदार अजित सिंग 1947 मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले. 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धात ते देशासाठी लढले. अजितसिंगदेखील आपल्या नातवाचा पदवीदान समारंभ पाहण्यासाठी आयएमएमध्ये आले होते.
आपल्या नातवाच्या यशाबद्दल भावूक झालेले अजित सिंग म्हणाले की, त्यांचा नातू कुटुंबातील पहिला लष्करी अधिकारी असल्याचा मला अभिमान आहे. गगनज्योतचा धाकटा भाऊ जशन जोत सिंग (22) हा देखील सैन्यात शिपाई आहे आणि आर्मी कॅडेट कॉलेज ACC मध्ये अधिकारी होण्यासाठी तयारी करत आहे.
IMA मधून 373 कॅडेट्सची निवड
इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (IMA) येथे पार पडलेल्या पासिंग आऊट परेडनंतर भारतीय लष्कराला 331 तरुण अधिकाऱ्यांची तुकडी मिळाली आहे. सात मित्र देशांतील 42 कॅडेट्सही आयएमएकडून प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण 373 कॅडेट्सची निवड करण्यात आली आहे.