काश्मिरात लष्कराच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:43 AM2018-05-26T00:43:25+5:302018-05-26T00:43:25+5:30

कुलगामधील प्रकार : जम्मूमध्ये बस स्टँडवरही फेकला ग्रेनेड

Army terror attack in Kashmir | काश्मिरात लष्कराच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला

काश्मिरात लष्कराच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला

Next

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका कॅम्पवर दहशतवाद्यांनी शुक्रवारी दुपारी गे्रनेड फेकून हल्ला केला. या हल्ल्यात कुठल्याही हानीचे वृत्त अद्याप नाही. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ३४ राष्ट्रीय रायफलच्या नेहामा कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. यात कोणतीही हानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सूत्रांनी सांगितले की, या भागाला घेराव घालण्यात आला असून गेल्या २४ तासांतील हा तिसरा हल्ला आहे. लष्करप्रमुख जनरल बिपिनकुमार काश्मीरच्या पेहलगाममध्ये असतानाच हा हल्ला झाला आहे. जनरल रावत यांनी शुक्रवारी पाकिस्तानला अशारा दिला की, काश्मीर खोºयात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेनजीकच्या नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले जात आहे. (वृत्तसंस्था)

पोलिसांसह पाच जण जखमी
जम्मूमध्ये बीसी रोडवरील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह पाच जखमी झाले आहेत. या भागाला आता पोलिसांनी घेराव घातला आहे. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने कठुआमधील शाळा बंद ठेवल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या भागात गोळीबार सुरू आहे. यामुळे या परिसरातील एक लाखांवर रहिवाशांनी भीतीने घरे सोडून पळ काढला आहे. यावर्षी झालेल्या गोळीबारात ३९ नागरिक मृत्युमुखी पडले आणि १८ जवान शहीद झाले आहेत.

अतिरेक्यांकडून एकाची हत्या
काश्मीर खोºयातील बांदीपोरा जिल्ह्यात गुुरुवारी रात्री लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी एका रहिवाशाची गळा चिरून हत्या केली. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलिसांना मोहम्मद याकूब याचा मृतदेह आढळून आला. लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक अतिरेकी सलीम पररे याचा या हत्येमागे हात असल्याचा दावा पोलीस करत आहेत. हत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

कुलगाम जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यावरही दहशतवाद्यांनी आज हल्ला चढवला. पोलीस ठाण्यातील शस्त्रे पळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी लगेचच त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यामुळे दहशतवाद्यांचा प्रयत्न फसला. रामबन भागात सशस्त्र दले व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, दहशतवाद्यांचा छुप्पा अड्डा उद्ध्वस्त केला. तेथून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Army terror attack in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.