अग्निपथच्या भरती नियमांमध्ये मोठा बदल, आता ITI-पॉलिटेक्निक उत्तीर्णही करू शकणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:53 PM2023-02-21T15:53:59+5:302023-02-21T15:54:44+5:30
केंद्रातील एनडीए सरकारनं गेल्या तीन वर्षात लष्करातील जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती.
नवी दिल्ली-
केंद्रातील एनडीए सरकारनं गेल्या तीन वर्षात लष्करातील जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. सरकारनं आता अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. याअंतर्गत ITI-पॉलिटेक्निक उत्तीर्ण देखील अर्ज दाखल करू शकणार आहेत.
लष्करानं अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष वाढवण्यात आले आहेत. प्री स्किल्ड युवा देकील अग्निपथ भरतीत सहभाग घेऊ शकतात. आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण टेक्निकल ब्रांचमध्ये भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात. यातून प्री-स्किल्ड युवांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. इतकंच नाही तर यामुळे ट्रेनिंगसाठीचा कालावधी देखील कमी होणार आहे. या मोठ्या बदलानंतर आता आणखी जास्त युवा उमेदवारांना योजनेत सामील होता येणार आहे.
१६ फेब्रुवारीपासून अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्करात अग्नीवीरांच्या भरतीसाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. अग्निपथ भरती वर्ष २०२३-२४ साठी अविवाहित पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in येथे भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीची १५ मार्च २०२३ ही अंतिम मुदत आहे. तर निवड परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
नोटिफिकेशननुसार अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर किपर, ट्रेड्समॅनच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अग्नीवीर निवड प्रक्रियेत नुकतंच बदल करण्यात आले होते. यानुसार उमेदवारांना सर्वात आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना फिजिकल टेस्ट साठी निमंत्रित केलं जाईल.
अर्जासाठीची पात्रता काय?
१६ फेब्रुवारीला जारी नोटिफिकेशननुसार अग्नीवीर (जनरल ड्युटी) पदासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर अग्नीवीर (टेक्निकल) यासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्नीवीर क्लर्क (स्टोअर कीपर) पदासाठी कमीतकमी ६० टक्क्यांनी १२ उत्तीर्ण उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. अग्नीवीर ट्रेड्समनपदासाठी ८ वी आणि १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. आता नव्या बदलानुसार आयआयटी-पॉलिटेक्निक उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.