लष्करी गणवेशात आलेल्या अतिरेक्यांचा आसामात हल्ला

By admin | Published: August 6, 2016 03:50 AM2016-08-06T03:50:28+5:302016-08-06T03:50:28+5:30

आसाम भीषण दहशतवादी हल्ल्याने शुक्रवारी हादरला.

Army uniforms attacked in Assam | लष्करी गणवेशात आलेल्या अतिरेक्यांचा आसामात हल्ला

लष्करी गणवेशात आलेल्या अतिरेक्यांचा आसामात हल्ला

Next


कोकराझार (आसाम) : आसाम भीषण दहशतवादी हल्ल्याने शुक्रवारी हादरला. लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी आठवडी बाजारात घुसून ग्रेनेड फेकण्यासह अंदाधुंद गोळीबार केला. यात १४ ठार, तर २० जण जखमी झाले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोरांपैकी एक जण मारला गेला. या हल्ल्यात एनडीएफबी (एस) या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे.
येथून १२ कि. मी. अंतरावर असलेल्या बालाजान तिनीअली येथील आठवडी बाजाराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.
दुपारी साडेबारा वाजता पाच दहशतवादी एका व्हॅनने बाजारात आले व ग्रेनेड फेकत त्यांनी बाजारकरूंवर अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यात १२ लोक जागीच ठार झाले, तर दोघांनी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांत निर्भर्त्सना केली असून गृह मंत्रालय आसाम सरकारच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. कोकराझारमधील हल्ल्याने दु:खी झालो आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असे टिष्ट्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असे आसामचे पोलीस महासंचालक मुकेश सहाय यांनी सांगितले.
सुरक्षा दले जवळच गस्त घालत
होती. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी बाजाराकडे धाव घेऊन
प्रत्युत्तर दिले. यात एक हल्लेखोर मारला गेला, तर उर्वरित पळून गेले. दोन ते तीन दहशतवादी आसपास लपून बसल्याचा संशय असून, त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असे ते
म्हणाले. घटनास्थळाहून एके- ५६ आणि ४७ मालिकेच्या रायफलींसह ग्रेनेडस् जप्त करण्यात आले.
२० जखमींना शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, बहुतांश जखमींची
प्रकृती चिंताजनक आहे. सहा
मृतांची ओळख पटली असून, उर्वरित मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांत एका महिलेचाही समावेश आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या हत्याकांडाचा निषेध केला असून, जखमींना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी अर्थ, शिक्षण आणि आरोग्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांना घटनास्थळी जाऊन परिसरातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. आसाममधील लोकांचे सुरक्षेची काळजी वाहण्यास आपले सरकार बांधील असल्याचे सोनोवाल म्हणाले. आसाममधील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी २४ मे रोजी शपथ घेतली होती. लोकांच्या सुरक्षेसाठी दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करण्यास आमचे सरकार बांधील आहे. आम्ही कोणत्याही संघटनेचा कोणताही धोका सहन करणार नाही. दहशतवादी गटांना हाताळताना सरकार कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
बाजारातील हल्ला आणि आगामी स्वातंत्र्य दिनाच्या दृष्टिकोनातून राज्यभरातील पोलीस अधीक्षक आणि सर्व उपायुक्तांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंह दूरध्वनीवरून माझ्याशी बोलले. त्यांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांचे व जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या संकटाच्या घडीत आसामचे लोक शांतता बाळगतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या हल्ल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
>काश्मीर ते कोकराझार : सुरक्षेचा आढावा
काश्मिरातील हिंसाचार आणि आसाममधील आजच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील अंतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला.
अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ए. के. डोवल यांच्यासह विविध उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काश्मिरातील हिंसाचार केंद्रस्थानी ठेवून अंतर्गत सुरक्षा आघाडीवरील परिस्थितीचा आाढावा घेण्यात आला.
या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी डोवल यांच्याशी ३० मिनिटे स्वतंत्र चर्चा केली. यात डोवल यांनी आसाममधील दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती गृहमंत्र्यांना दिली.
>माणिक देबनाथ हे दुकानदार या रक्तपाताचे साक्षीदार आहेत. त्यांनी सांगितले की, लष्करी गणवेश घातलेले पाच जण व्हॅनमधून आले. त्यांनी कापडाने चेहरे झाकलेले होते. व्हॅनमधून उतरताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
१५ ते २० मिनिटे त्यांचा गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांनी एक ग्रेनेडही फेकला. त्यामुळे आठ दुकानांनी पेट घेतला आणि लोक जीव वाचविण्यासाठी वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळू लागले, असे ते म्हणाले.
>आसाममधील हल्ल्यात नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्डचा (एनडीएफबी-एस) हात असल्याचा संशय आहे. एनडीएफबीनेच या भागात यापूर्वी अनेक हल्ले केले आहेत, असे सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Army uniforms attacked in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.