चीन-पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराकडून 13 उपग्रहांचा वापर
By admin | Published: June 26, 2017 09:46 AM2017-06-26T09:46:59+5:302017-06-26T12:15:01+5:30
कार्टोसॅट-2 इ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येणा-या उपग्रहांची संख्या आता 13 झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - कार्टोसॅट-2 ई उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येणा-या उपग्रहांची संख्या आता 13 झाली आहे. इस्त्रोमधील सूत्रांनी ही माहिती दिली. टेहळणी आणि सीमा भागातील नकाशे रेखांकन करण्याबरोबरच शत्रूच्या जमीन आणि समुद्रातील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहांचा वापर करण्यात येणार आहे.
लष्करी उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणारे हे बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत स्थिर करण्यात आले आहेत. शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आलेला कार्टोसॅट-2 मालिकेतील उपग्रह 712 किलो वजनाचा आहे. गरजेनुसार विशिष्ट अशा भागांचे उच्च दर्जांचे फोटो पाठवण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. कार्टोसॅट आणि रिसॅट मालिकेतील उपग्रह खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येत आहेत.
आणखी वाचा
भारतीय नौदलही विविध भागात तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुडया, लढाऊ विमाने यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी जीसॅट-7 उपग्रहाचा वापर करते. भारताकडे आज उपग्रह विरोधी अस्त्र डागण्याची क्षमता आहे ज्यामध्ये शत्रूचा उपग्रह नष्ट करता येतो. आजच्या घडीला अशी क्षमता फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. शक्य असले तरी इस्त्रोला आज अशा उपग्रह विरोधी तंत्रज्ञानामध्ये पडण्याची अजिबात इच्छा नाहीय. इस्त्रो आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करते असे स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले.
एकाचवेळी 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
इस्रोने शुक्रवारी सकाळी पीएसएलव्ही-सी३८ या अग्निबाणाद्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी ९.२९ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केल्यानंतर २७ मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - २ मालिकेतील उपग्रहासह अन्य २९ छोट्या उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४० वे उड्डाण होते. ३१ उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि २९ परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट - २ मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन ७१२ किलो असून, अन्य ३० उपग्रहांचे मिळून २४३ किलो वजन आहे.