TRP Scam: रेटिंग फिक्स करण्याच्या मोबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 02:46 PM2021-01-25T14:46:50+5:302021-01-25T14:49:52+5:30
फॅमिली ट्रिपसाठीही १२ हजार डॉलर्स दिल्याचा दासगुप्ता यांचा जबाब
टीआरपी स्कॅम केसमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील समस्या वाढताना दिसत आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंन्सिल (BARC) इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांकडे लिखित स्वरूपात एक धक्कादायक दावा केला आहे. अर्णब गोस्वामी यांनी आपल्यालाल फॅमिली ट्रिपसाठी १२ हजार डॉलर्स दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच सप्लिमेंट्री चार्जशीटनुसार वृत्तवाहिनीच्या बाजूनं रेटिंग देण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी तीन वर्षांमध्ये ४० लाख रूपये मिळाले असल्याचंही दासगुप्ता यांनी सांगितल्याचं नमूद केलं आहे.
मुंबई पोलिसांनी ११ जानेवारी रोजी ३,६०० पानांची एक सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये BARC चा एक फॉरेन्सिक ऑटिड रिपोर्ट, दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील कथित व्हॉट्सअॅप चॅट आणि माजी काऊंन्सिल कर्मचारी आणि केबल ऑपरेटर्ससह ५९ लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
सप्लिमेंट्री चार्जशीट दासगुप्ता, माजी BARC सीओओ रोमिल रमगढिया आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे. पहिली चार्जशीट १२ जणांविरोधात नोव्हेंबर २०२० मध्ये दाखल झाली होती. दुसऱ्या चार्जशीटनुसार दासगुप्ता यांचा जबाब २७ डिसेंबर २०२० रोजी क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या कार्यालयात दोन साक्षीदारांच्या समोर संध्याकाळी सव्वा पाच वाजता नोंदवण्यात आला.
मदतीचं आश्वासन
"मी अर्णब गोस्वामींना २००४ पासून ओळखतो. २०१३ मध्ये BARC चं मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद स्वीकारलं. अर्णब गोस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्ही लाँच केला. त्यांनी लाँचिंगच्या पूर्वीच मला प्लॅनबाबत सांगितलं होतं आणि इशाऱ्या इशाऱ्यात त्यांनी वाहिनीला चांगलं रेटिंग देण्यासाठी मदतही मागितली होती. टीआरपी सिस्टम कसं काम करतं हे गोस्वामी यांना उत्तमरित्या माहित होतं. भविष्यात आपली मदत मिळावी यासाठी त्यांनी सांगितलं होतं," असं दासगुप्ता यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.
ट्रिपसाठी १२ हजार डॉलर्स
"मी टीआरपी रेटिंगमध्ये फेरफार करण्यासाठी आपल्या टीमसोबत काम केलं. त्यानंतर रिपब्लिक टीव्हीला पहिल्या क्रमांकाचं रेटिंग मिळालं. २०१७-२०१९ दरम्यान हे सुरू होतं. याच्या मोबदल्यात २०१७ मध्ये अर्णब यांनी लोअर परळ येथील सेंट रेझिस हॉटेलमध्ये माझी भेट घेतली आणि माझ्या फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या फॅमिली ट्रिपसाठी ६ हजार डॉलर्स दिलं. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी सेंट रेझिसमध्ये माझी पुन्हा भेट घेतली आणि मला स्वीडन आणि डेनमार्कच्या फॅमिली ट्रिपसाठी ६ हजार डॉलर्स दिले," असंही दासगुप्ता यांनी आपल्या जबाबात सांगितलं. "२०१७ मध्ये अर्णब मला आयटीसी परेल हॉलेमध्ये भेटले आणि त्यांनी मला रोख २० लाख दिले. त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये गोस्वामी यांनी पुन्हा १०-१० लाख रूपये दिले," असंही दासगुप्ता यांनी सांगितलं. दरम्यान, दासगुप्ता यांच्या वकिलांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दासगुप्ता यांचं हा जबाब नाकारत असल्याचं सांगितलं. तसंच हा जबाब दबावाखाली नोंदवला गेला असू शकतो आणि त्याची न्यायालयात कोणतीही सत्यता नाही, असंही त्यांनी म्हटलं.