अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीने मागितली माफी, म्हटलं होतं 'गुंड'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 12:57 PM2018-01-11T12:57:29+5:302018-01-11T13:03:34+5:30
माफी न मागितल्यास चॅनलच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर मंगळवारी रात्री 10 वाजता रिपब्लिक टीव्हीने आपल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली.
नवी दिल्ली : पत्रकार अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्ही चॅनलवर एका हिंदी न्यूज चॅनलच्या पत्रकाराला गुंड संबोधल्याबद्दल बुधवारी ( दि. 10) रात्री उशीरा माफी मागण्याची वेळ आली. यासाठी चॅनलने स्क्रीनवर माफीनाफा ऑन एअर केला होता. अजाणतेपणातून झालेल्या या चुकीबद्दल माफी मागतो असं चॅनलने म्हटलं. एबीपी न्यूजने याबाबतची माहिती ट्विटरद्ववारे शेअर केली आहे. रिपब्लिक टीव्हीने एबीपी न्यूजची माफी मागितली आहे असं ट्विट एबीपीने केलं. रिपब्लिक टीव्हीने जिग्नेश मेवाणीच्या युवा हुंकार रॅली दरम्यान एबीपी न्यूजचे वरीष्ठ पत्रकार जैनेंद्र कुमार यांना गुंड म्हटलं होतं.
गेल्या मंगळवारी दलित नेता आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी रॅली केली होती. इतर चॅनल्स प्रमाणे रिपब्लिक टीव्हीवरही याचं प्रसारण सुरू होतं. प्रसारणादरम्यान स्क्रीनवर दिसत असलेल्या आंदोलनातील काही लोकांना रिपब्लिक टीव्हीने गुंड म्हटलं. त्यामध्ये एबीपी न्यूजचे वरीष्ठ पत्रकार जैनेंद्र कुमार हे देखील होते.
त्यानंतर एबीपी न्यूजने रिपब्लिक टीव्हीकडे माफीची मागणी केली होती. माफी न मागितल्यास चॅनलच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर मंगळवारी रात्री 10 वाजता रिपब्लिक टीव्हीने आपल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली.