देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; जवळपास 150 महाविद्यालयांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:18 PM2023-05-30T22:18:03+5:302023-05-30T22:26:14+5:30

गेल्या महिनाभरापासून या महाविद्यालयांमध्ये चौकशी सुरू होती.

around 150 medical colleges across country may lose recognition sources | देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; जवळपास 150 महाविद्यालयांवर टांगती तलवार

देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; जवळपास 150 महाविद्यालयांवर टांगती तलवार

googlenewsNext

नवी दिली : भारत सरकारने देशातील 40 वैद्यकीयमहाविद्यालयांवर मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महाविद्यालये गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील आहेत. या महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला.

देशात अशी एकूण 150 महाविद्यालये आहेत, ज्यांवर आगामी काळात कारवाई केली जाऊ शकते. ही महाविद्यालये दर्जेदार न राहिल्यास त्यांची मान्यताही रद्द केली जाईल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला या महाविद्यालयांमध्ये तपासणीदरम्यान बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही कॅमेरे, प्राध्यापक यासारख्या कमतरता आढळून आल्या, असे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून या महाविद्यालयांमध्ये चौकशी सुरू होती. त्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हे पाऊल उचलले. वैद्यकीय महाविद्यालये चालवण्यासाठी ठरवून दिलेल्या मानकांचे पालन या महाविद्यालयांमध्ये होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, कॅमेरा बसवण्यात अडचणी होत्या. बायोमेट्रिक सुविधा नीट काम करत नव्हती. तपासणी दरम्यान प्राध्यापकांमध्ये कमतरता दिसून आली.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयांना अपील करण्याची वेळ असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, मान्यता रद्द केल्याच्या 30 दिवसांच्या आत महाविद्यालये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पहिले अपील दाखल करू शकतात. जर त्याचे अपील येथे फेटाळले गेले तर ते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे जाऊ शकतो.

Web Title: around 150 medical colleges across country may lose recognition sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.