पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव
By कुणाल गवाणकर | Published: January 6, 2021 11:20 PM2021-01-06T23:20:09+5:302021-01-06T23:22:32+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉन्चिंग पॅड्स सक्रिय; दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
श्रीनगर: हिवाळ्यात सीमेपलीकडून जवळपास ४०० दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली. सीमेपलीकडे असलेल्या लॉन्च पॅडवर असलेले दहशतवादी हिवाळ्यात नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करू शकतात, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू असून अनेक भागांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत सीमेपलीकडे असलेले दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू करतात. यंदाच्या हिवाळ्यातही तब्बल ४०० दहशतवादी सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात आहेत. २०१८ मध्ये १४३, २०१९ मध्ये १४१, तर २०२० मध्ये ४४ दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. पाकिस्तानी सैनिक सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करतात. त्यावेळी भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर दिलं जात असताना दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जाते. गेल्या वर्षात भारतीय जवानांनी सीमेपलीकडून होत असलेले घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं वर्षभरात ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. २००३ नंतर प्रथमच पाकिस्ताननं इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्चिंग पॅड्सवर ३०० ते ४१५ दहशतवादी आहेत. नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची योजना त्यांच्याकडून आखण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या इराद्यानं हा कट रचण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. पीर पंजालच्या (काश्मीर खोरं) उत्तरेला नियंत्रण रेषेच्या जवळ असलेल्या लॉन्च पॅडवर १७५ ते २१०, तर पीर पंजालच्या (जम्मू क्षेत्र) दक्षिणेला असलेल्या नियंत्रण रेषेजवळील परिसरात ११९ ते २१६ दहशतवादी घुसखोरीची तयारी करत असल्याची आकडेवारी त्यांनी दिली.