जगभर : एका ‘टिकली’चं महाभारत! संसारच तुटण्याची आली होती वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:40 IST2025-02-06T08:39:15+5:302025-02-06T08:40:43+5:30
उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती.

जगभर : एका ‘टिकली’चं महाभारत! संसारच तुटण्याची आली होती वेळ
बांगड्या, टिकल्या, गळ्यातलं, कानातलं.. या गोष्टी म्हणजे भारतीय महिलांसाठी केवळ साजशृंगार नाही, तर तो एक मोठा सांस्कृतिक, पारंपरिक वारसा आणि ठेवाही आहे. त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही अतिशय हळवा असतो. विवाहित स्त्रियांसाठी तर अधिकच. त्यामुळेच स्त्रियांना त्याचं अपरंपार कौतुकही असतं.
उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती. काय होतं हे कारण? - तर कपाळावरची टिकली! टिकली ही कोणाला अगदी क्षुल्लक गोष्ट वाटेल, पण त्याचं महत्त्व स्त्रियांसाठी खरोखरच अनन्यसाधारण.
आग्र्यामध्ये नुकतीच घडलेली ही घटना. नुकतंच एका जोडप्याचं लग्न झालेलं. नववधू सासरी रमत होती. वेगवेगळ्या गोष्टी स्वत:हून समजून घेत होती. सासरी आल्यावर बऱ्याचदा अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतात. बऱ्याच महिला ही अतिरिक्त जबाबदारी आनंदानं स्वीकारतात आणि निभावतातही. तसंच ही नववधूही सासरचा स्वभाव, आवड-निवड समजून घेत होती. त्यानुसार स्वत:ला बदलत होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.
काही दिवसांनी मात्र त्या दोघा नवरा-बायकोत खटके उडायला लागले. हे भांडण होतं टिकलीवरून. बायको दिवसातून अनेकदा टिकली बदलते हे काही नवऱ्याला आवडायचं नाही. बायकोला तर टिकल्यांची आवड. कपाळावर टिकली नाही, असं होणंही तिच्या बाबतीत शक्यच नव्हतं. कारण प्रत्येक महिलेसाठी तो सौभाग्यलंकार असतो.
बायको दिवसातून इतक्या वेळा टिकल्या का बदलते, याचं सुरुवातीला नवऱ्याला आश्चर्य वाटायचं. त्यानंतर त्याला त्याचा राग यायला लागला. आपण सकाळी जेव्हा घरातून निघून कामावर जातो, तेव्हा बायकोच्या कपाळावर एक टिकली असते, तर घरी आल्यावर दुसरीच. दिवसातून अनेकदा ती टिकली बदलते हे त्याला आवडायचं नाही. मग त्यानं बायकोला मोजून टिकल्या द्यायला सुरुवात केली. दिवसाला फक्त एक. आज एक टिकली दिली की मग दुसऱ्या दिवशी दुसरी टिकली.
बायकोला काही ही गोष्ट रुचली नाही. एवढीशी ती टिकली; पण या टिकल्याही आपला नवरा आपल्याला देत नाही. मोजून मापून देतो. त्याचा हिशेब ठेवतो, यावरून तिलाही सुरुवातीला वाईट वाटलं. हळूहळू तिला या गोष्टीचा राग यायला लागला. नंतर तर तिचा संताप इतका अनावर झाला की ती घर सोडून थेट माहेरी निघून गेली.
एवढंच नाही, पोलिस ठाण्यात तिनं नवऱ्याविरुद्ध तक्रारही नोंदवली. तीन महिने सासरचं तोंडही तिनं पाहिलं नाही. शेवटी पोलिसांनीच मध्यस्थी केली. दोघांनाही मॅरेज काउन्सिलरकडे पाठवण्यात आलं. तिथे एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पडला.
नववधू सासरी दिवसभर काही ना काही काम करीत असायची. कामात बऱ्याचदा कपाळावरची टिकली निघून जायची किंवा पडून जायची. कपाळ उघडं कसं ठेवणार? - म्हणून ती लगेच दुसरी टिकली लावायची. दुसरीकडे नवऱ्याला वाटायचं, मी घरी नसताना ही टिकली का बदलते? त्याला ते विचित्र वाटायचं. काऊन्सिलरनं दोघांमधले गैरसमज दूर केल्यावर नवऱ्यालाही आपली चूक कळली. बायको पुन्हा सासरी आली. ‘टिकली पुराण’ संपलं. निदान आतातरी दोघंही सुखानं नांदताहेत.