Arpita Mukherjee: अर्पिता मुखर्जींना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात; ED च्या धाडीत सापडले होते २१ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:33 PM2022-07-24T23:33:07+5:302022-07-24T23:35:18+5:30
शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या कारचा अपघात झाला आहे.
कोलकाता-
शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या कारचा अपघात झाला आहे. ईडीचा ताफा अर्पिया मुखर्जी यांना कोर्ट परिसरातून सीजीओ कॉम्प्लेक्सच्या दिशेनं जात असताना कारचा अपघात झाला. ही घटना सीजीओ कॉम्प्लेक्स परिसरातील सॉल्ट लेक परिसरातील आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी सुरक्षित असून किरकोळ दुर्घटना होती. त्यामुळे सुदैवानं कोणतीही हानी झालेली नाही. शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरुन अर्पिता मुखर्जी यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांची जामीन याचिका देखील नाकारली आहे. ईडी आता उद्या अर्पिता यांना पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आणखी किती जणांची नावं आहेत हे शोधण्याचा ईडी प्रयत्न करत आहे.
ईडीच्या छाप्यांमध्ये शुक्रवारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्यातून ही रक्कम मिळाल्याचा संशय आहे. सूत्रांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी अनेकदा अर्पिता मुखर्जीच्या घरी जात असत. यासोबतच पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी टॉलीगंजच्या डायमंड सिटी कॉम्प्लेक्समधील अर्पिता मुखर्जी यांच्या आलिशान घरातून रोख रकमेसह २० मोबाइल फोनही जप्त केले आहेत. ईडी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, हे मोबाईल फोन WBSSC आणि WBBPE मधील शिक्षक भरती घोटाळ्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. ईडीने निवेदनात दावा केला आहे की, शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत होते, यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती.