उत्तर प्रदेशातून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक
By Admin | Published: July 10, 2017 03:30 PM2017-07-10T15:30:43+5:302017-07-10T15:30:43+5:30
जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथेून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे.
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 10 - जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथेून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. संदीप शर्मा उर्फ आदिल असं या दहशतवाद्याचं नाव आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले की, 1 जुलै रोजी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करीचा खात्मा करण्यात आला. संदीप शर्मादेखील त्याच घरात होता, जेथे लश्करीनं लपून राहिला होता. एटीएम लुटणे व अन्य दहशतवादी कारवायांमध्ये संदीपचा सहभाग आहे.
काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले राम शर्मा यांचा मुलगा संदीप शर्माला पोलिसांनी मुझफ्फरनगर येथून अटक केली. शिवाय संदीपनं स्वतःचे नाव बदलून आदिले असे ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
दहशतवादी संदीप शर्मा हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. शोपूरमधील शकूर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात होता. संदीप 2012 काश्मीर खो-यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. संदीपवर शस्त्रास्त्र लुटणं, दहशतवादी हल्ले घडवणे यांसारखे आरोप आहेत, अशी माहितीदेखील खान यांनी दिली.
दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दलानं 1 जुलै रोजी झालेल्या चकमकीत लष्कर -ए- तोयबाच्या कमांडर बशीर लश्करीसहीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गेल्या महिन्यात अचबल येथे पोलीस दलावर झालेल्या हल्ल्यात बशीरचा सहभाग होता. या हल्ल्यात पोलीस स्टेशनचे प्रभारी फिरोज अहमद डार यांच्यासहीत 6 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी शहिदांच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती.
यानंतर 1 जुलै रोजी लष्कर कमांडर बशीर लश्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.