'अटक करायची असेल तर करा, पण मी पश्चिम बंगालला जाणारच'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:16 PM2018-08-01T16:16:28+5:302018-08-01T16:18:36+5:30
भाजपा अध्यक्ष 11 ऑगस्टला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली: परवानगी मिळो, अथवा न मिळो, मी पश्चिम बंगालला जाणारच, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. अमित शहा 11 ऑगस्टला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. माझा पश्चिम बंगाल दौरा निश्चित आहे. जर राज्य सरकारला मला अटक करायची असल्यास, त्यांनी ती जरुर करावी, असंही शहा म्हणाले. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आलं आहे. त्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहांचा पश्चिम बंगाल दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यातील 40 लाख लोकांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. कागदपत्रं नसली म्हणून काय नागरिकांना देशाबाहेर हाकलणार का?, असा प्रश्न बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी उपस्थित केला आहे. मायावती यांच्यासोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाला देशात गृहयुद्ध पेटवायचं आहे, असा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हा मुद्दा लावून धरला असताना दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष आणि खासदार अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांवर शरसंधान साधलं. राजीव गांधी पंतप्रधान असताना 1985 मध्ये आसाम करार करण्यात आला. मात्र या कराराची अंमलबजावणी करण्याची हिंमत काँग्रेसनं दाखवली नाही. मात्र भाजपानं हे धाडस दाखवलं आणि राजीव गांधींना जे जमलं नाही, ते करुन दाखवलं, असं शहा राज्यसभेत म्हणाले. 40 लाख घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय, असा सवाल उपस्थित करत शहांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला होता. यानंतर काँग्रेस खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं.