मुलगी ‘विकत’ घेणाऱ्या आमदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2016 05:35 AM2016-05-06T05:35:35+5:302016-05-06T05:35:35+5:30
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आमदार बाबूश मोन्सेरात यांनी एका महिलेला ५० लाख रुपये देऊन मुलीच्या सावत्र आईकडून विकत घेतले होते, असे तपासातून उघडकीस
पणजी : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आमदार बाबूश मोन्सेरात यांनी एका महिलेला ५० लाख रुपये देऊन मुलीच्या सावत्र आईकडून विकत घेतले होते, असे तपासातून उघडकीस आले आहे. बाबूश दुपारी ३ वाजता रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण विभागाला शरण आले असून, पोलिसांनी पीडितेच्या आईला अटक केली आहे.
बलात्कार प्रकरणात मोन्सेरात यांच्याबरोबरच मुलीची सावत्र आईही तितकीच जबाबदार असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले आहे. आपल्या सावत्र आईने एका महिलेच्या मदतीने ५० लाख रुपये घेऊन आपल्याला बाबूशला विकून टाकले, असे तिने पोलिसांना सांगितले आहे. तिच्या या लेखी जबाबामुळे मोन्सेरात आणखी अडचणीत आले आहेत. कारण बलात्काराबरोबरच मानवी तस्करीअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या सवत आईलाही मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. मार्चमध्ये मोन्सेरात यांच्या ज्या फार्म हाउसवर ही घटना घडल्याचे पीडित मुलीने सांगितले त्या फार्म हाउसची पोलिसांनी कसून चौकशी केली. उत्तर गोव्याचे फॉरेन्सिक फिरती मोबाइल व्हॅनसह पथकही त्या ठिकाणी हजर होते. काही नमुनेही या पथकाने गोळा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)