तुरुंगात होतेय केजरीवालांचे खच्चीकरण; संजय सिंह यांचा आरोप, सुविधा काढल्या, कुटुंबियांना भेटण्यास मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:20 AM2024-04-14T05:20:11+5:302024-04-14T05:20:39+5:30
केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचे सिंह यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मनोधैर्य खचविण्यासाठी तिहार तुरुंगात कायद्याने मिळणाऱ्या किमान सुविधा आणि अधिकार उघडपणे हिरावून घेतल्या जात असल्याचा आरोप शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी केला. तुरुंगाच्या नियमांनुसार अतिशय जहाल आरोपींच्याही भेटी समोरासमोर करण्याचा अधिकार तुरुंग प्रशासनाला असतो. पण केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचे सिंह यांनी सांगितले.
केजरीवाल यांच्यासोबत भेटीसाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केलेला अर्ज मंजूर केल्यानंतर ऐनवेळी तो रद्द करण्यात आला. सुरक्षेच्या कारणामुळे एवढ्या अल्प काळात ही भेट घडवून आणता येत नसल्याचे तिहार प्रशासनाकडून सांगण्यात आले. तिहार तुरुंगात महत्त्वाच्या व्यक्तींच्या यापूर्वी अशा पद्धतीने किती भेटी झाल्या, प्रकाश सिंह बादल मुख्यमंत्री असताना त्यांची तुरुंगातील भेट कशाप्रकारे घडवून आणली गेली होती, हेही केंद्राने सांगावे, असे आव्हान संजय सिंह यांनी दिले.
इथेच सुब्रतो राय सहारा यांना दिल्या सर्व सुविधा
याच तुरुंगात सुब्रतो राय सहारा यांच्या इंटरनेट, फोनसह सर्व कार्यालयीन सुविधांसह बैठकी व्हायच्या. पण केजरीवाल यांना अपमानित करून मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने हे सगळे अमानवीय प्रकार सुरू असल्याचा आरोप सिंह यांनी केला. आपण दिल्लीचे खासदार असूनही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.
आंबेडकर जयंतीनिमित्त ‘संविधान बचाओ’
देशाला विरोधी पक्षविहीन बनवून एका पक्षाची हुकूमशाही प्रस्थापित करणे, देशाची संसद आणि राज्यांमधील विधानसभांसह निष्पक्ष निवडणुकांची हमी देणारा निवडणूक आयोग आणि केंद्रीय तपास संस्थांना आपल्या मुठीत ठेवणे हा राज्यघटना आणि लोकशाहीवरील हल्ला नव्हे तर काय आहे? अशा शब्दात आपचे नेते गोपाल राय यांनी भाजपवर हल्ला चढविला. पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दिल्लीसह २४ राज्यांच्या राजधान्यांमध्ये ‘संविधान बचाओ’चा संकल्प घेण्याचे ठरविले आहे.