दारूबंदीचे उल्लंघन करणा-या जदयू नेत्या मनोरमादेवीविरोधात अटक वॉरंट
By admin | Published: May 11, 2016 10:10 AM2016-05-11T10:10:28+5:302016-05-11T10:12:18+5:30
बिहारमधील दारूबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जदयूच्या निलंबित नेत्या मनोरमादेवीविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ११ - ओव्हरटेक केल्याच्या रागात तरूणाची हत्या करणा-या आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणा-या सत्ताधारी जद (यू) पक्षाच्या विधान परिषद सदस्य मनोरमादेवी यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्यावर आता त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार लटकत आहे. बिहारमध्ये गेल्या महिन्यापासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र मनोरमादेवी यांनी दारूबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे.
मनोरमादेवी यांचा फरार मुलगा राकेश रंजन यादव उर्फ रॉकी यादव याला एका युवकाच्या हत्येप्रकरणी मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. त्याप्रकरणीच सोमवारी मनोरमादेवी यांच्या निवासस्थानी मारण्यात आलेल्या छाप्यात काही सामग्री जप्त करण्यात आली. त्यात दारूच्या काही बाटल्याही सापडल्या होत्या. त्यानंतरच मनोरमादेवी यांनी राज्यातील दारूबंदीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
गया जिल्ह्याच्या रामपूर ठाण्याच्या परिसरातकार ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने रॉकीने आदित्य या तरूणाला गोळी घालून ठार मारले होते. त्यानंतर तो फरार होता. अखेर मंगळवारी त्याला मंगळवारी सकाळी ‘बे्रटा कंपनी’च्या पिस्टलसह पकडण्यात आले. या पिस्टलचा त्याने हत्याकांडात वापर केला होता. बोधगया ठाणेअंतर्गत असलेल्या त्याचे वडील बिंदेश्वरी यादव यांच्या मालकीच्या मिक्सर प्लँट परिसरात तो आढळला. या प्रकरणी मनोरमादेवी यांचा एक अंगरक्षक राजेशकुमार याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.