अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 01:47 PM2024-11-14T13:47:44+5:302024-11-14T13:48:50+5:30
काल राजस्थानमध्ये नरेश मीणा यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली.
काल राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील देवरी-उनियाला विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी एसडीएमला थप्पड मारल्याची घटना समोर आली. ही घटना काल बुधवारची आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी नरेश मीणा यांना बुधवारी सायंकाळी अटक केल्याच्या विरोधात मीणा समाजातील लोकांचा रोषही दिसून येत होता.
एसडीएमला थप्पड मारल्यानंतर नरेश मीणा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी रात्रीपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. आज पोलिसांनी त्यांना सामरावता गावातून अटक केली आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नरेश मीणा यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस गावात पोहोचले तेव्हा ते आधीच त्यांच्या समर्थकांसह बसले होते. नरेश मीणा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, पोलिस अतिशय क्रूर होते, काल जिल्हाधिकारी दिवसा आले असते तर काही झाले नसते.
नरेश मीणा म्हणाले की, एसडीएम जरी मीणा जातीचा असता तरी मी त्यांना मारहाण केली असती, जरी तो गुर्जर असता तरी मी त्यांना मारहाण केली असती, जरी ते ब्राह्मण असते तरी मी त्यांना मारहाण केली असती. SDM ला जात नसते, नरेश मीणा यांनी एसडीएमवर आरोप केला की त्यांच्या देखरेखीखाली बनावट मतदान होत आहे.
काल रात्री नरेश मीणा यांना अटक करण्यासाठी पोलीस सामरावता गावात पोहोचले असता त्यांच्या समर्थकांनी दगडफेक सुरू केली. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी गोंधळ करणाऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी ६० जणांना अटक केली असून चार एफआयआरही नोंदवले आहेत.
देवरी-उनियारा विधानसभा मतदारसंघातील कचरवाटा ग्रामपंचायतीच्या समरावत गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यांचे गाव आधी उनियारा उपविभागात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, मात्र नंतर मागील सरकारने त्यांचे गाव उनियारामधून काढून देवळी उपविभागात समाविष्ट केले.
यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. गावाचा पुन्हा एकदा उनियारामध्ये समावेश करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नरेश मीणा हे गावकऱ्यांवर मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.