ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्या रिक्षाचालकाला अटक राहाता तालुक्यातून अटक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने रचला सापळा
By admin | Published: August 23, 2016 11:32 PM2016-08-23T23:32:34+5:302016-08-24T00:54:46+5:30
नाशिक : आठवडाभरापूर्वी शालिमारच्या एका लुटारू रिक्षाचालकाने आपल्या मित्राच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकाला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रिक्षातून नेऊन धमकावत २० हजाराचा माल लुटला होता. याप्रकरणी संशयिताला राहाता तालुक्यातून भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
नाशिक : आठवडाभरापूर्वी शालिमारच्या एका लुटारू रिक्षाचालकाने आपल्या मित्राच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकाला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रिक्षातून नेऊन धमकावत २० हजाराचा माल लुटला होता. याप्रकरणी संशयिताला राहाता तालुक्यातून भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शालिमार रिक्षा थांब्यावरून एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला उत्तमनगरला जाण्यासाठी प्रमोद अनंत देशमुख ( रा. उत्तमनगर) हे रिक्षात (एम.एच.१५ एके ५२३९) बसले होते. दरम्यान, रिक्षाचालक अनिल छबू जाधव (२०, हेडगेवार चौक, सिडको) याने त्याच्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने देशमुख यांना दीड तास शहरात फिरविले. देशमुख यांच्या हातात सोन्याची अंगठी, मनगटी घड्याळ, रोख रक्कम, महागडा मोबाइल पाहून या दोघांनी त्यांना लुटण्याचा इरादा केला. कृषिनगर परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नेऊन दोघांनी मिळून देशमुख यांना धमकावले. अंगठी, मोबाइल, एक हजाराची रक्कम, मनगटी घड्याळ असा एकूण १९ हजार ९२० रुपयांचा माल लुटला व रिक्षातून पळ काढला. याप्रकरणी देशमुख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध फिर्याद दिली होती.
आठवडाभरापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी शहरातील रिक्षा थांब्यावर लुटारूच्या संशयास्पद रिक्षाचा शोध घेत होते. रिक्षाचा क्रमांकही देशमुख यांनी बघितलेला नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती; मात्र त्यांनी सांगितलेल्या रिक्षेच्या वर्णनावरून पोलीस रिक्षाचा शोध घेत होते. पोलिसांना संशयित जाधव हा कोळपेवाडी (ता. राहाता) येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तांबे यांनी विशेष पथक जाधवच्या मागावर पाठविले. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी पोलीस कर्मचार्यांसमवेत संशयित रिक्षाचालक जाधव यास रिक्षासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याची अंगठी, मोबाइल, एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आला आहे. रिक्षाचा मालक, अल्पवयीन साथीदार आदिबाबत संशयिताकडे चौकशी सुरू असून अधिक तपास वारे करीत आहेत.