भय, शांतता अन् दहशत! बकरी ईदच्यापूर्वी काश्मिरी लोकांच्या मनात काय चाललं आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 10:47 AM2019-08-09T10:47:29+5:302019-08-09T10:49:02+5:30
पंतप्रधानांनी ईदच्या शुभेच्छा काश्मिरी लोकांना दिल्या असल्या तरी ईदचा उत्सव पूर्वीसारखा साजरा करायला मिळेल की नाही याची भीती लोकांच्या मनात आहे.
श्रीनगर - माजी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी लैला जबीन यांचे कुटुंब दरवर्षी ईद-उल-अजहाच्या वेळी बकऱ्यांची कुर्बानी देत असतं. मात्र यावेळी ते बोकड अथवा बकरी विकत घेऊ शकणार नाहीत. तर दुसरीकडे फारुक जान या गोष्टीने चिंतेत आहेत की त्यांच्या पत्नीचे डायलिसिसच वेळेवर होईल का नाही? कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या लोकांचे आयुष्य त्यांच्या घरामध्येच कैद झाल्याचं चित्र आहे. रस्त्यावर शांतता पसरली आहे. बाजारांमध्ये असणारी गर्दी गायब झाली आहे. सण जवळ आला तरी त्या उत्सवाची तयारी करण्याऐवजी लोकांच्या मनात संशयाचं वातावरण तयार झालं आहे. पंतप्रधानांनी ईदच्या शुभेच्छा काश्मिरी लोकांना दिल्या असल्या तरी ईदचा उत्सव पूर्वीसारखा साजरा करायला मिळेल की नाही याची भीती लोकांच्या मनात आहे.
300 खाटांचे रुग्णालय असणाऱ्या एसएमएचएस हॉस्पिटलमधील एका डॉक्टराने सांगितले की, सध्याच्या वातावरणात मला रुग्णांवर उपचार करणे कठीण जात आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी मी कर्फ्यूमधून मार्ग काढत रोज हॉस्पिटला येतो. मी जर हॉस्पिटलला आलो नाही तर माझ्या रुग्णांचे काय होणार? असा विचार माझ्या मनात येतो. जम्मू काश्मीरमधील लोकांसोबत असं व्हायला नको.
फारुक यांच्या पत्नीला डायलिसिस करण्याची आवश्यकता भासते. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना फारुक यांनी सांगितले की, पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून दोन फर्फ्यूचे पास मिळाले आहेत. अशा स्थितीत त्यांना पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. अशा परिस्थितीत राहिल्याने मनाला शांती मिळत नाही.
श्रीनगरनजीक सोलिना येथे राहणारे मंजोर अहमद सांगतात की, ईदचा सण जवळ येत आहे. मात्र अद्यापही शहरातील परिस्थिती सुधारण्याचे काही संकेत दिसत नाही. त्यामुळे ईदचा सण यंदा साजरा करु शकणार नाही अशी मानसिकता बनवायला हवी.
एकीकडे प्रशासनाकडून दावा केला जातोय की, जम्मू काश्मीरमधील स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली झाली आहे. स्थिती नियंत्रणात आहे. मात्र लोकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. माध्यम प्रतिनिधींनाही परिसरात कर्फ्यूचे पास न देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचं पोलिसांनी एका पत्रकाराला सांगण्यात आलं.