काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्पच; अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 09:14 AM2019-10-08T09:14:56+5:302019-10-08T09:17:45+5:30
दोन महिन्यांपासून काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्प
श्रीनगर: काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली. याचा परिणाम राज्यातील संपर्क व्यवस्थेवर झाला आहे. काश्मीरमध्ये कित्येक वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम काश्मीर खोऱ्यातील अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत आहे. काश्मीरमधील आयटी कंपन्या धोक्यात आल्या आहेत. त्यातील अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 'इंडिया टुडे'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
रंगरेट भागात काश्मीरमधलं सर्वात मोठं सॉफ्टवेअर पार्क आहे. यातील अनेक आयटी कंपन्या सध्या धोक्यात आहेत. इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीत भागीदार असलेल्या शौकत अहमद यांनी त्यांची व्यथा मांडली. सहा वर्षांपूर्वी अहमद यांनी सुरू केलेल्या कंपनीत सध्या ३० पेक्षा अधिक तरुण काम करतात. त्यांच्या कंपनीकडे देश, परदेशातील अनेक प्रकल्प आहेत. मात्र गेले दोन महिने इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानं इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीला प्रचंड नुकसान सोसावं लागलं आहे.
आमचं संपूर्ण काम इंटरनेट चालतं. मात्र इंटरनेट सुविधाच नसल्यानं आमच्या ग्राहकांशी संपर्क साधताना अतिशय अडचणी येत असल्याचं शौकत यांनी सांगितलं. इंटरनेटच नसल्यानं आम्ही काम थांबवलं आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आम्हाला कंपनी बंद करावी लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शाहिद नासीर नावाच्या उद्योजकानंदेखील कंपनी संकटात सापडल्याचं सांगितलं. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भविष्यासाठी चांगला असल्याचं सरकार सांगतं. मात्र आमच्या वर्तमानाचं काय, असा सवाल नासीर यांनी उपस्थित केला.