कोलकात्याच्या बाजारात ‘कृत्रिम’ अंड्यांची विक्री
By admin | Published: April 2, 2017 12:57 AM2017-04-02T00:57:13+5:302017-04-02T00:57:13+5:30
कोंबडीच्या प्लॅस्टिक-सदृश ‘कृत्रिम’ अंड्यांची विक्री केल्याच्या आरोपावरून कोलकाता शहरातील पार्क सर्कस मार्केटमधील मोहम्मद शमीम अन्सारी
कोलकाता : कोंबडीच्या प्लॅस्टिक-सदृश ‘कृत्रिम’ अंड्यांची विक्री केल्याच्या आरोपावरून कोलकाता शहरातील पार्क सर्कस मार्केटमधील मोहम्मद शमीम अन्सारी या दुकानदारास पोलिसांनी अटक केली. अनिता कुमार नावाच्या एका गृहिणीने पोलीस ठाण्यात केलेल्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी ही माहिती कळविल्यानंतर कोलकाता महापालिकेचा आरोग्य विभागही लगेच कामाला लागला. त्यांच्या पथकाने शहरातील इतर बाजारांमध्येही छापे घालून अशाच प्रकारच्या ‘संशयास्पद’ अंड्यांचे नमुने ताब्यात घेतले. त्यांचे वैज्ञानिक परीक्षण झाल्यानंतर या अंड्यांचे खरे स्वरूप स्पष्ट होईल. अनिता कुमार म्हणाल्या की, आॅम्लेट करण्यासाठी ही अंडी फोडली, तेव्हा त्यांचे कवच मला प्लॅस्टिकसारखे वाटले आणि संशय आला. पॅनमध्ये अंड्यातील भाग घातल्यावर तेही प्लॅस्टिकसारखे चकचकीत व चिवट झाले. काडी पेटवून त्यावर टाकली, तेव्हा आॅम्लेटने पेट घेतला आणि संशय ठाम
झाला.
मोहम्मद शमीम अन्सारी या दुकानदाराने ज्या घाऊक विक्रेत्याकडून ही अंडी खरेदी केली होती त्याच्याकडूनही अशा अंड्यांचे काही क्रेट हस्तगत करण्यात आले. अन्सारी याने त्याच्याकडून दीड लाख रुपयांची अंडी खरेदी केली होती. बाजारात ही अंडी कुठून आली व ती नेमकी कशी बनविली गेली आहेत, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ही अंडी बनावट व कृत्रिम आहेत, असे सिद्ध झाल्यास त्यांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
अशा अंड्यांचे सेवन प्राणघातक ठरल्यास विक्रेत्यास जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. (वृत्तसंस्था)