कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणसांना फटका; ॲमेझॉनमध्ये कर्मचारी कपातीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 06:29 AM2023-11-21T06:29:20+5:302023-11-21T06:29:44+5:30
ॲमेझॉनमध्ये कर्मचारी कपातीचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) अनेक क्षेत्रात लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचे समोर आहे. ॲमेझॉनने ‘ॲलेक्सा व्हॉइस असिस्टंट युनिट’मध्ये कर्मचारी कपात करून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे अधिक लक्ष देणार आहे. ॲलेक्सा आणि फायर टीव्हीचे उपाध्यक्ष डॅनियल रॉश म्हणाले की, स्रोतांत वृद्धी करून एआयवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये ॲमेझॉनने ॲलेक्सामधील एआय यंत्रणा अद्ययावत केली होती.
सूत्रांनी सांगितले की, ॲमेझॉनमधील नव्या कर्मचारी कपातीचा फटका भारत व कॅनडासह अनेक देशांतील कर्मचाऱ्यांना बसेल. ॲमेझॉनमध्ये होत असलेली ही काही पहिलीच कर्मचारी कपात नाही. याआधी कंपनीने अनेकवेळा कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यंदा आतापर्यंत २७ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने घरी बसवले आहे.
ॲमेझॉन ॲलेक्सा हे एक व्हॉइस असिस्टंट युनिट आहे. टायमर सेट करणे, सर्च करणे, संगीत प्ले करणे तसेच होम ऑटोमेशनसाठी ॲलेक्साचा उपयोग होतो. ॲमेझॉनला अनेक कंपन्यांकडून आव्हान मिळत असल्याने येत्या काळात एआयवरील पकड मजबूत राहावी, यासाठी कंपनीने धोरणात बदल केला आहे.
१८० जणांना काढले
ॲमेझॉनने अलीकडेच आपल्या गेम डिव्हिजनमध्ये दुसऱ्या टप्प्यातील कर्मचारी कपात करताना १८० जणांना काढले आहे. कंपनीच्या गेम डिव्हिजनमध्ये व्यवसायात अडचणी होत्या. त्यामुळे कर्मचारी कपात करण्यात आली.