‘असहिष्णू’ कलाकारांनीच परत केले पुरस्कार
By admin | Published: October 14, 2015 12:49 AM2015-10-14T00:49:48+5:302015-10-14T00:49:48+5:30
देशातील कथित ‘वाढत्या असहिष्णुतेच्या’ विरोधात आपले पुरस्कार परत करणाऱ्या देशातील साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी तिखट टीका केली.
नवी दिल्ली : देशातील कथित ‘वाढत्या असहिष्णुतेच्या’ विरोधात आपले पुरस्कार परत करणाऱ्या देशातील साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी तिखट टीका केली. हिंदू धर्म विकृत करणे आणि भारत नष्ट करण्याच्या प्रयत्नांतर्गत धर्मनिरपेक्षतेच्या काही ‘असहिष्णू’ ठेके दारांनीच आपले पुरस्कार परत केले आहेत, असे संघाने म्हटले.
रा. स्व. संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्रातील ‘दिन पलटे, बात उलटी’ शीर्षकाखालील ताज्या अग्रलेखात पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर कडवे ताशेरे ओढण्यात आले आहेत. देशात कुणाचीही सत्ता असो; पण धर्मनिरपेक्षतेच्या या ठेकेदारांना (पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना)नेहरू मॉडेलशिवाय अन्य काहीही स्वीकार्य नाही. तेच नेहरू ज्यांनी, १९३८ मध्ये जिन्ना यांना लिहिलेल्या पत्रात गोहत्या करणे मुस्लिमांचा मौलिक अधिकार असल्याचे म्हटले होते.
शिवाय काँग्रेसी काळात गोहत्या जारी ठेवण्याचे वचन दिले होते. एवढेच नाही तर गोहत्या सुरू ठेवण्यासाठी पंतप्रधानपद सोडण्याची तयारीही दाखवली होती. हिंदू धर्मास विकृत करणाऱ्या अशा लेखकांना शीख दंगलीतील दोषींच्या हातून स्वत:चा गौरव करून घेण्यात जराही वाईट वाटले नाही. काश्मिरातील विस्थापित हिंदंूबाबत हा वर्ग अवाक्षरही बोलला नाही.