अरुण जेटलींनाही कॅन्सरचं निदान, उपचारांसाठी अमेरिकेला गेल्यानं अर्थसंकल्प जेटलींविना?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 12:34 PM2019-01-16T12:34:10+5:302019-01-16T12:34:57+5:30
अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकरात लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. गेल्यावर्षीच जेटलींवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता, जेटली यांना कॅन्सर रोगाचे निदान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहेत. तर, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही जेटली उपस्थित राहणार नाहीत, अशी सुत्रांची माहिती आहे.
अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकरात लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जेटली ताबडतोब न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. जेटली हे वैयक्तिक कामासाठी 2 आठवड्यांच्या सुट्टीवर असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून जेटलींच्या कॅन्सरबाबत कुठलिही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तर, जेटलींच्या नजिकच्या व्यक्तीकडून याबाबत माहिती मिळाली असून जेटलींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी अधिकवेळ जेटलींना अमेरिकेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाला जेटली हजर राहण्याची शक्यता कमी आहे, अशीही सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी यंदाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर यंदाचा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.