किडनी प्रत्यारोपणानंतर अरुण जेटलींना एम्समधून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 05:00 PM2018-06-04T17:00:09+5:302018-06-04T17:00:09+5:30
जेटलींनी मानले डॉक्टरांचे आभार
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जेटली यांच्यावर 14 मे रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. जेटली यांच्यावर उपचार सुरू असल्यानं अर्थ खात्याचा प्रभार पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला होता. तीन आठवडे एम्समध्ये उपचार घेतल्यावर जेटली आज दुपारी घरी परतले. रुग्णालयातून निघताना त्यांनी डॉक्टर, परिचारिका यांचे आभार मानले.
घरी आल्यामुळे आनंद वाटतोय, असं ट्विट अरुण जेटली यांनी केलं. 'गेल्या तीन आठवड्यांपासून माझी काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांचे मी आभार मानतो. याशिवाय माझी प्रकृती सुधारण्यासाठी मला शुभेच्छा देणाऱ्या माझ्या मित्रांचा, सहकाऱ्यांचा आणि हितचिंतकांचाही मी आभारी आहे,' असंही जेटलींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या जेटली यांना 12 मे रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर 14 मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. एम्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटली यांच्या नातेवाईकांधील एका मध्यमवयीन महिलेनं त्यांच्यासाठी किडनी दान केली. जेटली यांच्यावर 20 जणांच्या टीमनं शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर संसर्ग टाळण्यासाठी जेटलींना एका वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. याच वॉर्डमध्ये असताना त्यांनी मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त फेसबुक पोस्ट लिहिली होती.