अरुण जेटलींचं निधन, रिपब्लिक अन् अर्णब गोस्वामींसाठी विजयासारखं सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 08:38 AM2021-01-18T08:38:24+5:302021-01-18T08:49:17+5:30
विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकची कुणकूण आधीच लागली होती. असा दावा लीक झालेल्या व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारावरून करण्यात आला आहे.
मुंबई - लीक झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमधील माहितीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्अॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता या चॅटबाबच अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यासोबतच अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर रिपब्लिक भारत हिंदी टीव्हीत विजयाच्या सेलिब्रेशनसारखं वातावरण होतं, हे या व्हॉट्सअप चॅटमधून सिद्ध होतंय. यावरुन अनेकांनी गोस्वामींच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
रिपल्बिक भारत चॅनेलमध्ये अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त दिल्यानंतर हा पत्रकारितेचा मोठा विजय असल्यासारखं सेलिब्रेशन करण्यात आल्याचंही गोस्वामी यांच्या लीक झालेल्या चॅटमधून सिद्ध होतंय, असे वृत्त नवभारत टाइम्सने दिलंय. अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर यापूर्वीही अनेकांनी भाजपाधारित असल्याचा आरोप केला होता. आता, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याननंतर पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेला आणि रिपब्लिक टीव्हीवर टीका करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकची कुणकूण आधीच लागली होती. असा दावा लीक झालेल्या व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारावरून करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र हा हल्ला होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधीच काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती आपल्या चॅटमधून दिली होती. मिळत असलेल्या माहितीनुसार २३ फेब्रुवारीच्या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती पार्थो दासगुप्ता यांना दिली होती.
दरम्यान, अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या संभाषणात सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे समोर आले आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार करण्यात आला. हाच विषय ट्रेडिंगवरही होता, अशी माहिती मिळाली आहे.