अरुण जेटलींनी फेटाळली देशाच्या कृषीमंत्र्यांची मागणी
By admin | Published: November 18, 2016 12:20 PM2016-11-18T12:20:16+5:302016-11-18T12:45:59+5:30
शेतक-यांना कर्ज खात्यातून आठवडयाला २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देऊन केंद्र सरकारने दिलासा दिला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - शेतक-यांना कर्ज खात्यातून आठवडयाला २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देऊन केंद्र सरकारने दिलासा दिला. मात्र त्याआधी शेतक-यांना ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी बियाणे खरेदी करु द्यावे ही केंद्रीय कृषीमंत्रालयाने केलेली मागणी अर्थमंत्रालयाने फेटाळून लावल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
जन धन खात्यांमध्ये अचानक डिपॉझिटसमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या खात्यांचा काळापैसा सफेद करण्यासाठी वापर होत असल्याचा सरकारला संशय आहे. त्यामुळेच जुन्या नोटांनी बियाणे खरेदी करण्याची मागणी फेटाळून लावली. ग्रामीण भागामध्ये १६ कोटी जन खात्यांचा वापर सुरु आहे.
नोटा बदलण्यासाठी,पैसा काढण्यासाठी आणि बियाणे खरेदीसाठी शेतकरी या खात्याचा वापर करत आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना १५ नोव्हेंबरला पत्र पाठवले. एअरलाईन्स, रेल्वे, पेट्रोल पंप आणि रुग्णालय या ठिकाणी विशेष बाब म्हणून २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरण्यास परवानगी आहे.
त्याप्रमाणे सरकारकडून चालवण्यात येणा-या बी-बियाणांच्या संस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी अशी त्यांनी पत्रातून मागणी केली होती. यामुळे शेतक-यांना एनएससी सारख्या संस्थांकडून चांगल्या दर्जाची बियाणे खरेदी करता येतील असे कृषीमंत्र्यांचे म्हणणे होते.
२४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटांनी शेतक-यांना दिवसाला १० हजार रुपयांपर्यंत बियाणे खरेदी करु द्यावे अशी त्यांची मागणी होती. यात कुठले गैरप्रकारे होऊ नये यासाठी त्यांनी उपायही सुचवले होते. पण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.