बँका भरमसाट कर्ज वाटप करत असताना आरबीआयनं दुर्लक्ष केलं- अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 09:31 AM2018-10-31T09:31:58+5:302018-10-31T12:32:09+5:30
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली- केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर टीका केली आहे. जेटली म्हणाले, 2008 ते 2014मध्ये बँका मनमानीपणे कर्जे वाटप करीत सुटली होती. तेव्हा आरबीआयनं दुर्लक्ष केलं. त्यानंतर आज अरुण जेटली आणि आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा आमना-सामना होणार आहे.
अरुण जेटली वित्तीय स्थायित्व आणि विकास परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या कार्यक्रमात आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल सहभागी होणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला काल पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची मागणी केली होती. तसेच आरबीआयच्या कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करणं थांबवावं, असंही पत्रात म्हटलं होतं.
जर तुम्ही आरबीआयच्या कामातील ढवळाढवळ बंद केली नाही, तर त्याचे परिणाम भोगायलाही तयार राहा, असा इशाराच आरबीआय कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं दिला होता. सरकारकडून बँकांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचवला जातोय, असाही या पत्रात उल्लेख होता. आरबीआयचे उप गव्हर्नर वीरल आचार्य यांनीही कर्मचारी संघटनेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. ज्यात सरकार हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलं आहे. आरबीआय संघटनेच्या विधानानंतर राहुल गांधींनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल केंद्रीय बँकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे, असंही राहुल गांधी म्हणाले होते.