ऑगस्ट महिन्यातच अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा स्वीकारणार पदभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 01:26 PM2018-08-03T13:26:22+5:302018-08-03T13:36:43+5:30
तीन महिन्यांच्या दीर्घकाळानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
नवी दिल्ली- तीन महिन्यांच्या दीर्घकाळानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंत्रालयाचे कामकाज पाहाणे शक्य नव्हते. आता पुन्हा ते या महिन्यात पदभार स्वीकारतील.
2014 साली नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर अरुण जेटली यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यांच्याकडे काही काळ संरक्षण मंत्रालयाचीही जबाबदारी होती. विविध मंत्रालयांची जबाबदारी एकाचवेळी सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांनी कामातून विश्रांतीसाठी सुटी घेतली होती. आता ते नॉर्त ब्लॉकमध्ये पहिल्या मजल्यावरील कार्यालयातून पुन्हा कामकाजाला सुरुवात करतील. डॉक्टरांनी त्यांना तीन महिन्यांची विश्रांती घेण्याची सूचना केली होती. आता कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून पूर्ण स्वच्छ व सॅनिटाईज करण्यात आले आहे.
शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांती घेतल्यावर अरुण जेटली समाजमाध्यमांवर आपली मते मांडत होते. जीएसटीसह इतर अनेक विषय़ांवर त्यांनी फेसबुकवर आपली मते मांडली आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला आहे. गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरही शस्त्रक्रीया करण्यात आली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार पुन्हा सांभाळायला सुरुवात केली.