अरुण जेटली सर्वाधिक श्रीमंत मंत्री
By admin | Published: October 8, 2014 02:49 AM2014-10-08T02:49:07+5:302014-10-08T03:03:39+5:30
अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत़ त्यांच्याकडे ७२१० कोटींची मालमत्ता आहे़
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे १़२६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे़ त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी, तसेच अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत़ त्यांच्याकडे ७२़१० कोटींची मालमत्ता आहे़
पंतप्रधानांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या संपत्तीचा तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे़ मोदी मंत्रिमंडळातील एकूण २२ मंत्र्यांपैकी १७ मंत्री कोट्यधीश आहेत़ मालमत्तेच्या यादीत अरुण जेटली आघाडीवर आहेत, तर शहरविकास मंत्री वेंकय्या नायडू सर्वात पिछाडीवर आहेत़ त्यांच्याकडे केवळ २०़४५ लाख रुपयांची मालमत्ता आहे़
मोदींकडे ३८,७०० रुपयांची रोख आहे़ १,३२,६९८ रुपयांच्या बँकेतीत जमा, तर १७,००,९२७ रुपयांच्या ठेवी, २०,००० बाँड, १,९९,०३१ च्या विमा पॉलिसी,२,३५,००० चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, तर १,२०,९८० चे दागदागिने आहेत़ गांधीनगर येथे एक कोटी रुपये किमतीचे स्वत:चे घर आहे़ मोदींनी त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या संपत्तीचा उल्लेख आपल्या तपशिलात केलेला नाही़ पत्नीच्या संपत्तीबाबतच्या रकान्यात ‘माहिती नाही’ केवळ एवढे त्यांनी लिहिले आहे़
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्रुषा आणि महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याकडे ३७़६८ कोटींची संपत्ती आहे़ पीयूष गोयल यांच्याकडे ३१़६८ कोटींची, नजमा हेपतुल्ला यांच्याकडे २९़७० कोटींची, तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे २़७३ कोटींची संपत्ती आहे़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे २़५६ कोटींची मालमत्ता आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)