Arun Jaitley's Biography : 28 डिसेंबर 1952 ते 24 ऑगस्ट 2019... अरुण जेटलींची 'बायोग्राफी'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 01:11 PM2019-08-24T13:11:11+5:302019-08-24T13:37:11+5:30
देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (24 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी 26 मे 1014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
Arun Jaitley : देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधनhttps://t.co/smgtVJ3MGP#ArunJaitley
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2019
1952 ते 2019... अरुण जेटलींची 'बायोग्राफी'
1952 - नवी दिल्लीत जन्म.
1957 - शाळेत प्रवेश. येथेच त्यांच्या विचारसरणीला व राजकीय विचारांना दिशा मिळाली.
1969 - व्यावसायिक कारकीर्दीची पायाभरणी करणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतली. फर्डा वक्ता व विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष म्हणून नाव कमावले.
1974 - काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दिल्ली विद्यापीठात अभाविपची उमेदवारी घेऊन विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी निवड.
1975 - आणीबाणीविरुद्ध बंड पुकारल्याने 19 महिन्यांची जेल. कारावासात विविध व्यक्तींच्या सहवासाने व्यक्तिमत्त्वाला उभारी मिळाली.
1977 - आणीबाणीच्या असंतोषातून लढल्या गेलेल्या 1977 च्या निवडणुकीत देशभरात प्रचार केला. लोकतांत्रिक युवा मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक पदावरून जनता पार्टीसाठी धडाडीने बाजू मांडली.
1980 - भारतीय जनता पक्षात प्रवेश.
1982 - संगीता यांच्याशी विवाहबद्ध.
1983 - सोनाली या कन्येचा जन्म.
1989 - पुत्र रोहनचा जन्म.
1990 - अतिरिक्त सॉलिसीटर जनरल पदावरून बोफोर्स खटला लढला.
1991 - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले.
1991 - संयुक्त राष्ट्रांत भारतातून गेलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य.
1999 - दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना अध्यक्षपदी निवड.
2000 - केंद्रीय मंत्रिमंडळात विधि, न्याय व कंपनी व्यवहार मंत्रालयाची धुरा.
2001 - जहाज बांधणी मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार. बंदरांच्या आधुनिकी-करणावर लक्ष
2002 - भाजप सरचिटणीस
2003 - मेक्सिकोत जागतिक व्यापार संघटनेच्या चर्चेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व.
2006 - गुजरातमधून राज्यसभेवर फेरनिवड.
2009 - राज्यसभेत विरोधी पक्षनेते. अनेक मुद्यांवर भाजपची आक्रमक भूमिका मांडली. बीसीसीआय उपाध्यक्ष.
2012 - राज्यभेवर पुन्हा निवड. पुन्हा विरोधी पक्षनेतेपदी निवड.
2014 - माहिती व प्रसारण मंत्रालयाचा पदभार घेतला. अर्थ, संरक्षण व कॉर्पोरेट व्यवहारमंत्री.
2018 - उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर फेरनिवड
2019 - दु:खद निधन.
'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता, एनडीएचा आधार गेला!' https://t.co/XBN0cO1SU1
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2019
अरुण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर हा दुर्मीळ आजार झाला होता. या आजारावरील उपचारासाठी ते 13 जानेवारी रोजी अमेरिकेत गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ते भारतात परत आले होते. दरम्यान, जेटलींच्या अनुपस्थितीत पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात जेटली यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता.