जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अरुण जेटलींचा पाकला इशारा
By admin | Published: May 1, 2017 09:11 PM2017-05-01T21:11:21+5:302017-05-01T21:11:21+5:30
भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि नंतर त्यातून अंग काढून घ्यायचे, असा पाकिस्तानचा निर्लज्जपणा अजूनही सुरूच आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि नंतर त्यातून अंग काढून घ्यायचे, असा पाकिस्तानचा निर्लज्जपणा अजूनही सुरूच आहे. नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय शहीद जवानांच्या पार्थिवाची विटंबना करूनही पाकिस्तान असं काहीही केलं नसल्याचा दावा करत आहे.
आम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही, तसेच आम्ही भारतीय जवानांच्या पार्थिवाची विटंबनाही केली नाही, असा खुलासा पाकिस्तानी लष्करानं केला आहे. त्यासाठी त्यांनी एक प्रसिद्धी पत्रकही जारी केलं आहे. त्यानंतर खळवलेल्या अरुण जेटलींनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, पाकिस्तानला याचा हिशेब चुक्ता करावा लागेल, असंही ठणकावलं आहे. हे कृत्य आमच्या शेजा-यांचं आहे. असे प्रकार तर युद्धातही होत नाहीत. शांतीच्या काळात असं कधीच घडत नाही. आम्ही पाकिस्तानच्या या अमानवीय आणि भ्याडपणाच्या कृत्याचा निषेध करतो. पूर्ण देशाला लष्करावर विश्वास आहे. भारतीय जवानांचं बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, असंही त्यांनी पाकिस्तानला सांगितलं आहे.
गेल्या काही तासांपूर्वी शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडकडून देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येतो आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असताना यात दोन जवान आज शहीद झाले. या दरम्यानच शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. सोमवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले.