गेल्या दोन वर्षांत भाजपाने गमावली 'पंचरत्न'; कधीच भरून न येणारी हानी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 07:18 PM2019-08-24T19:18:51+5:302019-08-24T19:28:02+5:30

सत्ताधारी भाजपाची गेल्या दोन वर्षांत पाच रत्ने हरपली आहेत.

arun jaitly death in the last 2 years bjp lost these 5 giants including arun jaitley sushma swaraj | गेल्या दोन वर्षांत भाजपाने गमावली 'पंचरत्न'; कधीच भरून न येणारी हानी!

गेल्या दोन वर्षांत भाजपाने गमावली 'पंचरत्न'; कधीच भरून न येणारी हानी!

googlenewsNext

नवी दिल्लीः सत्ताधारी भाजपाची गेल्या दोन वर्षांत पाच रत्ने हरपली आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांना भाजपानं गमावलं आहे. भाजपानं गमावलेल्या नेत्यांमध्ये काही राजकारणात सक्रिय होते, तर काहींनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. या पंचरत्नांच्या जाण्याची हानी कधीही भरून न निघणारी आहे. सुषमा स्वराज अन् मनोहर पर्रिकरांसह अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. भाजपाची पंचरत्ने अनंतात विलीन झाली आहे. 
अटलबिहारी वाजपेयी
16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. अटल बिहारी वाजपेयींना किडनीचा त्रास आणि मूत्रमार्गात संक्रमण झाल्यानं 11 जून 2018 रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून अटलबिहारी यांनी पदवी संपादित केली, त्यांना हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयांत प्रावीण्य मिळाले होते. अटलबिहारी वाजपेयींनी तीनदा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं होतं.  
अनंत कुमार 
केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचं नोव्हेंबर 2018मध्ये निधन झालं होतं. बंगळुरूच्या बसवानागुडी येथील श्री शंकर कँसर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या 59 व्या वर्षी सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनंतकुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारमध्ये मंत्री होते.अनंत कुमार यांना कर्करोगाचा आजार होता. त्यासाठी लंडनला जाऊनही त्यांनी उपचार घेतले होते. नुकतेच, गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर, बंगळुरू येथील श्री शंकर कँसर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. 
मनोहर पर्रीकर
गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019ला निधन झाले. मनोहर पर्रीकर यांची राजकीय कारकीर्द ही पंचवीस ते सव्वीस वर्षांची. १९९४ साली त्यांनी पहिले यश पाहिले. त्या साली ते पणजीचे आमदार झाले. भाजप व मगोपची त्या वेळी युती होती व पर्रीकर यांनी पणजीतून निवडणूक लढवावी असे ठरले. आपल्या आयुष्यातील पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पर्रीकर जिंकले व विधानसभेत पोहचले. देशाच्या संरक्षणमंत्रिपदापर्यंत पोहचून आलेल्या या नेत्याची राजकीय कारकीर्द ही केवळ यशानेच भरलेली नाही. ती खूप कष्टांनी, संघर्षाने व बऱ्याच चढउतारांनी भरलेली आहे. अनेकांना ठाऊक नसेल; पण पर्रीकर यांनी प्रथम लोकसभा निवडणूक लढवली होती.


सुषमा स्वराज
सुषमा स्वराज यांचं 6 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालं. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे हृदयविकाराने निधन झालं. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. 1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या कायम स्मरणात राहतील. 1977 ते 1979 दरम्यान समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या.राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या.

अरुण जेटली 
नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३ मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 

Web Title: arun jaitly death in the last 2 years bjp lost these 5 giants including arun jaitley sushma swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.