सपा भाजपामध्ये होणार विलीन? एसबीएसपीच्या नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 05:43 PM2022-12-22T17:43:25+5:302022-12-22T17:46:00+5:30
या विलीनीकरणात सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव महत्त्वाची भूमिका बजावतील, असा दावा अरुण राजभर यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी (BJP) आणि समाजवादी पार्टी (SP) हे परस्परविरोधी पक्ष आहेत. मात्र, यादरम्यान सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे (SBSP) प्रमुख ओम प्रकाश राजभर (OP Rajbhar) यांचे पुत्र अरुण राजभर (Arun Rajbhar) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, सपा लवकरच भाजपमध्ये विलीन होणार असून त्यासाठी करारही झाला आहे. या विलीनीकरणात सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव महत्त्वाची भूमिका बजावतील, असा दावा अरुण राजभर यांनी केला आहे.
एसबीएसपी पूर्वी सपा आणि भाजपा या दोघांचा सहयोगी पक्ष होता, त्यामुळे एसबीएसपीने केलेल्या या दाव्याचा आधार सर्वांना जाणून घ्यायचा आहे. यासंदर्भात एसबीएसपीचे राष्ट्रीय प्रवक्ते अरुण राजभर यांनी ट्विट केले की, शिवपाल चाचा यांच्या माध्यमातून सपा काही दिवसांत भाजपामध्ये विलीन होईल, करार झाला आहे.
दरम्यान, 2022 च्या विधानसभा निवडणुका सपा आणि एसबीएसपी यांनी एकत्र लढल्या होत्या. या निवडणुकीत एसबीएसपीने 6 जागा जिंकल्या होत्या. मात्र नंतर ओपी राजभर आणि अखिलेश यादव यांच्यातील वाढत्या दरीमुळे दोन्ही पक्ष वेगळे झाले. अरुण राजभर यांच्या या दाव्यावर सपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
विशेष म्हणजे, सध्या एसबीएसपी आणि भाजपाची जवळीक वाढू लागली आहे. अलीकडेच, एसबीएसपीचे प्रमुख ओपी राजभर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसले. यावेळी दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, 2017 च्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपा युतीने राज्यात 325 जागा जिंकल्या होत्या, तेव्हा एसबीएसपी देखील युतीचा एक घटक पक्ष होता. पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनाही योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. मात्र नंतर ओपी राजभर यांनी युती तोडून बंडखोरी केली.