'सर्जिकल स्ट्राईक' नाही तर 'फर्जिकल स्ट्राईक', अरुण शौरींची भाजपावर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 10:51 AM2018-06-26T10:51:40+5:302018-06-26T11:31:40+5:30
केंद्र सरकारचे आर्थिक धोरण व नोटांबदीवर टीका करणाऱ्या अरुण शौरी यांनी आता काश्मीर मुद्यावरुन सरकारला टार्गेट केले आहे.
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत केंद्र सरकार वारंवार कोणत्या-ना-कोणत्या कारणांवरुन हल्लाबोल करताना दिसतात. केंद्र सरकारचे आर्थिक धोरण व नोटांबदीवर टीका करणाऱ्या अरुण शौरी यांनी आता काश्मीर मुद्यावरुन सरकारला टार्गेट केले आहे. मोदी सरकार काश्मीर मुद्यावर अपयशी ठरल्याचा आरोप शौरी यांनी केला आहे. तसंच, सरकारची काश्मीर, चीन आणि पाकिस्तानच्या मुद्यावर कोणतीही नीती नाही, असंही शौरी म्हणालेत. शिवाय, मोदी सरकारनं पाकिस्तानवर केलेला 'सर्जिकल स्ट्राईक' नाही तर 'फर्जिकल स्ट्राईक' आहे, अशी बोचरी टीकादेखील शौरी यांनी केली.
भारतीय सैन्य काम करतं आणि सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. फर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख भारतीय सैन्यासाठी केला नसून सरकारसाठी केला आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
काश्मीर मुद्यावर वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे नेते सैफुद्दीन सोज यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अरुण शौरी बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री जयराम रमेश, कुलदीप नायर उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वीही अरुण शौरी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची कार्यपद्धती पाहता 2019 पर्यंत ते स्वत:च्या पराभवासाठी जमीन तयार करण्यात नक्कीच यशस्वी ठरतील'', असा खोचक टोला शौरी यांनी लगावला होता.