Arunachal Pradesh: अरुणाचलमधून बेपत्ता झालेला मुलगा अखेर सापडला, चीनी सैन्याने भारतीय लष्कराला दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 12:41 PM2022-01-23T12:41:13+5:302022-01-23T12:41:33+5:30
Arunachal Pradesh: चीनच्या सीमेत हा मुलगा चीनी सैन्याला सापडला आहे. आता त्याला परत भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.'
नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातून अपहरण झालेल्या 17 वर्षीय मीराम तारोन या मुलाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. चिनी सैन्य पीएलए(PLA)वर या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप होता. पण आता हा मुलगा अखेर सापडला आहे. पीएलएने भारतीय लष्कराला ही माहिती दिली आहे.
मागील काही दिवसांपासून भारतीय लष्कराकडून या तरुणाचा शोध सुरू होता. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांकडून याबाबत माहिती घेतली. सुरुवातीला चिनी सैनिकांनी या तरुणाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. दोनच दिवसांपूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पीएलएवरील अपहरणाच्या आरोपांचे खंडन केले होते आणि या प्रकरणाची माहिती नसल्याचे म्हटले होते. मात्र आज चिनी सैनिकांनी भारतीय लष्कराला सांगितले की, त्यांच्या भागात एक तरुण सापडला आहे.
भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू
तेजपूरमधील पीआरओ डिफेन्स लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी सांगितले की, 'चीनी लष्कराने त्यांना अरुणाचल प्रदेशमधून हरवलेला मुलगा सापडल्याची माहिती दिली आहे. चीनच्या सीमेजवळ हा मुलगा चीनी सैन्याला सापडला आहे. आता त्याला परत भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.'
भाजप खासदाराने प्रकरण समोर आणले
अरुणाचल प्रदेशातील सिंगला येथील लुंगटा जोर परिसरात राहणारा 17 वर्षीय मीराम तारोन मंगळवारी(18 जानेवारी)बेपत्ता झाला होता. हा तरुण बेपत्ता झाल्याची बातमी अरुणाचल पूर्वेचे खासदार तापीर गाओ यांनी दिली होती. चिनी सैनिकांनी या तरुणाला ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. पण, आता हा मुलगा सापडला आहे.