अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग, भारताचं चीनला प्रत्युत्तर
By admin | Published: April 20, 2017 08:58 PM2017-04-20T20:58:11+5:302017-04-20T20:58:11+5:30
चीनकडून अरुणाचल प्रदेशमधल्या सहा ठिकाणांची नावं बदलल्यानंतर भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - चीनकडून अरुणाचल प्रदेशमधल्या सहा ठिकाणांची नावं बदलल्यानंतर भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. नाव बदलल्यानं खरी परिस्थिती बदलत नसते, असा उपरोधिक टोला भारतानं चीनला लगावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, असंही भारतानं चीनला ठणकावलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं की, चीन सरकारशी आतापर्यंत कोणतीही बातचीत झाली नाही. दोन्ही देशांतील सीमेचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वेगवेगळी व्यवस्था बनवण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे की, दोन्ही देशांसाठी यथोचित तोडगा निघेल. तर दुसरीकडे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यानंतर भडकलेल्या चीननं भारताच्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांची नावं बदलली आहेत. तसेच चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड प्रकल्पाच्या बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण मिळाल्यास आम्ही त्याचा विचार करू, असंही गोपाल बागले यांनी सांगितलं आहे.
चीननं पहिल्यांदाच मानकीकृत अधिकारांनी अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांचं नामकरण केलं आहे. चीनच्या मंत्रालयानं 14 एप्रिलला याची घोषणा केली होती. त्यांनी चिनी सरकारच्या नियमांनुसार दक्षिण तिबेट (अरुणाचल प्रदेश)च्या सहा ठिकाणांच्या नावांना चिनी, तिबेट आणि रोमन वर्णांनुसार मानकीकृत केलं होतं. या सहा ठिकाणांचं वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्युका, बुमो ला आणि नामकापुब री असं रोमन वर्णांनुसार नामकरण केलं होते. भारत ज्या भूभागाला "अरुणाचल प्रदेश" असे संबोधतो त्या "दक्षिण तिबेट" येथील सहा ठिकाणांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील वर्णानुसार नावे दिली आहेत", असे वृत्त चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने दिले होते. भारत-चीनदरम्यानच्या 3 हजार 488 किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून दोन्ही देशात वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून दक्षिण तिबेट संबोधले जाते.