अरुणाचल आमचाच, चीनला सुनावले खडे बोल; केंद्र सरकारने फटकारले, आक्षेप फेटाळून लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 05:30 AM2024-03-13T05:30:35+5:302024-03-13T05:30:49+5:30
अरुणाचल प्रदेशचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दौरा केला होता. अरुणाचल प्रदेश आमचा असून, भारताच्या हालचालींमुळे हा प्रश्न आणखी जटिल होणार आहे, असेही चीनने म्हटले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नुकत्याच केलेल्या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता. या भूमिकेबद्दल भारताने चीनने खडे बोल सुनावले आहेत. अरुणाचल हा भारताचाच अविभाज्य भाग होता व भविष्यातही तो राहील, असे केंद्र सरकारने चीनला ठणकावून सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेश हा आमचाच अविभाज्य भाग आहे ही भारताची ठाम भूमिका आहे व ती वेळोवेळी चीनला सांगण्यात आली आहे. या भारताच्या नेत्यांनी केलेला दौरा किंवा त्या भागात केलेली विकासकामे यांना चीन नेहमी आक्षेप घेतो.
अरुणाचल प्रदेशचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दौरा केला होता. अरुणाचल प्रदेश आमचा असून, भारताच्या हालचालींमुळे हा प्रश्न आणखी जटिल होणार आहे, असेही चीनने म्हटले होते. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे.
‘चीनने काहीही म्हटले, तरी वस्तुस्थिती बदलणार नाही’
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चीनने काहीही आक्षेप घेतले तरी वस्तुस्थिती काही बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे व तो कायम राहील. भारतातील नेते अन्य राज्यांप्रमाणे अरुणाचल प्रदेशचाही दौरा करत असतात.
‘तणावामुळे कोणाचाच फायदा झाला नाही’
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमाप्रश्नावरून भारत व चीनमध्ये गेल्या चार वर्षांपासून तणाव निर्माण झाला आहे. त्याचा दोन्ही देशांना काहीही फायदा झालेला नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
या सीमाप्रश्नावर योग्य तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र, या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दोन्ही देशांनी परस्परांचा सन्मान राखून करार करायला हवा व नियंत्रण रेषेला मान्यता द्यायला हवी, असे एस. जयशंकर यांनी सांगितले.