आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला, NSCN-KYA संघटनेचे तीन माओवादी चकमकीत ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 03:13 PM2021-11-15T15:13:25+5:302021-11-15T15:13:32+5:30
ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
इटानगर:अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम(NSCN-KYA) च्या तीन माओवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. 6 आसाम रायफल्सच्या सैनिकांनी चकमकीनंतर लाँगडिंग परिसरात या माओवाद्यांना कंठस्नान घातलं. माओवाद्यांविरोधात कारवाई अजूनही सुरुच आहे. दरम्यान, ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माओवाद्यांनी दोन नागरिकांचे अपहरण करुन म्यानमारला नेलं आहे. त्या नागरिकांचा शोध सध्या सुरू आहे. या वर्षी जुलैमध्येही तिरप पोलिसांसह आसाम रायफल्सच्या खोन्सा बटालियनच्या पथकाने सुरू केलेल्या विशेष संयुक्त कारवाईत याच गटातील दोन सदस्य ठार झाले होते. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड आणि त्यांच्या सर्व संस्था आणि आघाडीच्या संघटनांवर बेकायदेशीर कृत्य कायदा, 1967 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.
मणिपूरमधील हल्ल्याचा बदला
मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात म्यानमार सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मी(PLA) आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट(MNF) च्या दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सचे कर्नल, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि चार जवानांना गोळ्या घालून ठार केलं होतं. त्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी NSCN-KYA चे माओवादी मारले गेले आहेत. अशाप्रकारे आसाम रायफल्सने आपल्या कर्नलच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे.
अनेक नेत्यांकडून भ्याड हल्ल्याचा निषेध
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पीसी नायर आणि इतर अनेक नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध केला. संरक्षण मंत्री म्हणाले, मणिपूरच्या चुराचंदपूर येथे आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत क्लेशदायक आणि निषेधार्ह आहे. देशाने कर्नल आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांसह 5 शूर सैनिक गमावले आहेत. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. दोषींना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल.