अरूणाचल प्रदेशातील गाव झाले मालामाल! प्रत्येक कुटुंब झाले कोट्यधीश, जमिनीचा मिळाला प्रचंड मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:33 AM2018-02-10T00:33:14+5:302018-02-10T00:33:26+5:30
अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणा-या प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत.
इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणाºया प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत.
चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात असलेल्या या गावामध्ये भारतीय लष्कराला आपला तळ उभारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बोमजा गावातील तब्बल २00 एकर जमीन लष्कराने संपादित केली. संरक्षण मंत्रालयाने २00 एकर जमिनीचा मोबदला म्हणून, गावाला ४0 कोटी ८0 लाख रुपये दिले. गंमत म्हणजे गावात केवळ ३१ कुटुंबे राहत असल्याने प्रत्येक कुटुंबाला घसघशीत मोबदला मिळाला. बोमजा गावाती एका कुटुंबाला तर ६कोटी ७३ लाख इतकी भरपाई मिळाली आहे. त्या गावाची सर्वाधिक जमीन गावामध्ये होती. या बोमजा गावाचा आता आशियातील समृद्ध गावांच्या यादीत समावेश झाला आहे. सीमेवरील चीनच्या हालचाली वाढत असल्याचे पाहून बोमजामध्ये लष्करी तळ उभारण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला. (वृत्तसंस्था)
रक्कम जपून वापरा : बोमजा गावातील ३१ कुटुंबांपैकी २९ कुटुंबांना १ कोटी ९ लाख रुपये भरपाईपोटी मिळाले. उरलेल्या दोनपैकी एका कुटुंबाला २ कोटी ४५ लाख आणि एका कुटुंबाला ६.७३ कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. या कुटुंबांनी ही रक्कम जपून वापरावी आणि अन्यत्र शेतीसाठी जमिनीमध्येच गुंतवावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी जवळच्या गावातील जमिनी त्यांना मिळू शकतील का, याचा शोध सुरू आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावही अशाच प्रकारे समृद्ध झाले आहे. त्या ठिकाणीही लष्कराने काही कामे सुरू केली आहेत.
अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी एका समारंभात गावकºयांना त्यांच्या हक्काच्या रकमेचे धनादेश दिले.
केंद्राच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती मिळत असून,
रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्त्यांच्या विकासावर लक्ष दिले जात आहे. तसेच डिजिटल क्षेत्रातही राज्य प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे पेमा खांडू म्हणाले.