अरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची आत्महत्या
By admin | Published: August 10, 2016 04:21 AM2016-08-10T04:21:13+5:302016-08-10T04:21:13+5:30
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी मंगळवारी येथे कथितरीत्या आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यानंतर ईशान्येकडील या राज्यात हिंसक निदर्शनांना तोेंड फुटले आहे
इटानगर : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी मंगळवारी येथे कथितरीत्या आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यानंतर ईशान्येकडील या राज्यात हिंसक निदर्शनांना तोेंड फुटले आहे. संतप्त निदर्शकांनी उपमुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्र्यांच्या बंगल्यात तोडफोड केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्यासह मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या भागाची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही आठवड्यांपूर्वी कालिखो यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून अरुणाचलमध्ये काँग्रेसचे सरकार बहाल केले होते.
पुल यांनी येथील मुख्यमंत्री निवासस्थान अद्याप रिकामे केले नव्हते. तेथेच त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली, असे पोलिसांनी सांगितले. पुल यांनी शयनगृहातील पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नीला आढळून आले. सकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्युसमयी ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन पत्नी आणि चार मुले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ते बाहेरील कोणत्याही व्यक्तीला भेटले नव्हते. त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे.
पुल यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अनेक समर्थकांनी मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या बंगल्याला घेराव घालून पुल यांच्या अनैसर्गिक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याविरुद्ध बंड करून पुल यांनी भाजपच्या मदतीने १९ फेब्रुवारी रोजी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर १३ जुलैपर्यंत ते मुख्यमंत्रिपदी पाहिले. लहानपणी आई आणि वडील वारल्यानंतर अनाथ असलेल्या सुतारकामापासून कारकीर्द सुरू केली. सरकारी अधिकाऱ्यांकडील सुतारकाम करताना, त्यांनी पुढे रात्रशाळेत शिक्षण घेतले. पुल पुढे सुरक्षारक्षक व त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री बनले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली.