अरूंधती रॉयही परत करणार 'राष्ट्रीय पुरस्कार'
By admin | Published: November 5, 2015 01:40 PM2015-11-05T13:40:09+5:302015-11-05T13:41:46+5:30
देशातील असहिष्णूतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या 'पुरस्कार वापसी' मोहिमेत लेखिका अरूंधती रॉयही उतरल्या असून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - देशातील असहिष्णूतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या 'पुरस्कार वापसी' मोहिमेत 'बुकर' पुरस्कार विजेत्या, प्रख्यात लेखिका अरूंधती रॉय याही उतरल्या असून त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात विचारवंतांची होणारी हत्या, अल्पसंख्यांकावर होणारे हल्ले आणि बीफच्या बंदी या सर्व घटनांच्या निषेधार्थ रॉय यांनी हे पाऊल उचलले आहे.
रॉय यांना १९८९ साली आलेल्या ' IN which Annie Gives it those ones' या चित्रपटाच्या पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तोच पुरस्कार परत करण्याचा निर्णय रॉय यांनी घेतला आहे. देशातील नागरिकांना होणारी मारहाण, जाळपोळीत त्यांचा होणारा मृत्यू, विचारवंतांची हत्या या सर्व भीषण गोष्टी असून त्यासाठी 'असहिष्णू' हा शब्द वापरणे अयोग्य आहे. या देशातील नागरिकांना जिवंतपणीही हाल सहन करावे लागतात त्यामुळे देशात जे काही सुरू आहे, त्याची मला लाज वाटते असे रॉय यांनी नमूद केले आहे.
तसेच देशात काँग्रेसची सत्ता असतानाही आपण 'साहित्य अकादमी पुरस्कार' नाकारला होता असे सांगत त्यामुळे आपल्या या कृतीला भाजपा विरुद्ध काँग्रेस असा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान चित्रपट निर्माते कुंदन शहा यांनीही 'जाने भी दो यारो' या प्रसिद्ध चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत करणार असल्याची घोषित केले आहे.
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत पुरस्कार परत केले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अनेक दिग्दर्शकांनाही पुरस्कार परत केले आहेत.