Arvind Kejariwal: केजरीवालांचं भाजपला चॅलेंज; महापालिका निवडणूक वेळेत घेऊन, जिंकून दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 02:50 PM2022-03-23T14:50:48+5:302022-03-23T14:52:35+5:30
केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल
नवी दिल्ली - दिल्ली नगर निमग म्हणजे दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आम आदमी पक्षाने कोर्टाची पायरी चढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार निवडणुकांची घोषणा केली नाही, असे आपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर, आता आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला चॅलेंज दिलं आहे. लहान पक्षाला भाजप घाबरल्याचं त्यांनी म्हटलंय.
केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल. आज एखाद्या राज्यात तुम्ही विजयी होत आहात, दुसऱ्या राज्यात आणखी कोणीतरी. मात्र, एका लहानशा महापालिका निवडणुकीतील पराभवापासून वाचण्यासाठी देशासोबत खिलवाड करू नका. शहिदांच्या वीरतेबाबत खिलवाड करू नका, संविधानसोबत छेडछाड करू नका, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आज तुम्ही म्हणताय की तिन्ही महापालिकांना एकत्र करण्यासाठी निवडणुकांना टाळण्यात येत आहे. मात्र, या कारणासाठी निवडणुका टाळल्या जाऊ शकतात का?. उद्या गुजरातच्या निवडणुका आहेत, तेव्हा केंद्र सरकारला एक पत्र लिहून आम्ही महाराष्ट्र आणि गुजरातला एकत्र करणार आहोत. त्यामुळे, गुजरातमध्ये निवडणुका घेऊ नका, असे म्हणणार का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. तसेच, उद्या भाजप आणि आम आदमी पक्ष राहिल किंवा नाही, नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल राहतील किंवा नाही, पण हा देश वाचला पाहिजे. एक लहान निवडणूक जिंकण्यासाठी आपण देशाच्या व्यवस्थेसोबत छेडछेड करू नका, अशी माझी पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
काय आहे निवडणूक प्रकरण
राजधानी दिल्लीत मे महिन्यात एमसीडीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यामुळे एप्रिल महिन्यातच निवडणुका घेणे बंधनकारक आहे. मात्र, आयोगाच्या सायत्ततेवर केंद्र सरकारने गदा आणल्याचं आपने याचिकेत म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांची तयारी करत होता. विशेष म्हणजे नोटीस प्रकाशित करुन आयोगाने एप्रिल महिन्यात निवडणूक होईल, असे जाहीरही केले होते. 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या घोषणेसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार होती. मात्र, आयोगाने काही तासांअगोदर एक नोटीस जारी करुन पत्रकार परिषद रद्द केली. त्या नोटीसीत आयोगाने म्हटले की, उपराज्यपाल यांनी एक पत्र पाठवले आहे. त्यानुसार, केंद्र सरकार दिल्लीतील तिन्ही एमसीडींचे एकत्रीकरण करणार आहे. त्यामुळे, सध्या निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे लिहिले होते.