केजरीवालांना राऊज अव्हेन्यू कोर्टाचा झटका; ईडीच्या सांगण्यावरून १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:16 PM2024-04-01T12:16:12+5:302024-04-01T12:18:09+5:30
Arvind Kejariwal ED Custody Latest Update: कोर्टामध्ये ईडीने केजरीवाल सहकार्य करत नसल्याचा दावा केला आहे. ते ईडीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ईडीने केला होता.
ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊज अव्हेन्यू कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांची आज ईडी कोठडी संपली होती. ईडीने केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे.
कोर्टामध्ये ईडीने केजरीवाल सहकार्य करत नसल्याचा दावा केला आहे. ते ईडीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ईडीने केला होता. यावर कोर्टाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने २८ मार्चला केजरीवालांची ईडी कोठडी वाढविली होती. २१ मार्चला त्यांना ईडीने अटक केली होती. तेव्हा त्यांना सहा दिवसांच्या ईडी कोठडीत पाठविण्यात आले होते. आता केजरीवालांना तिहार तुरुंगात हलविले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना तुरुंग क्रमांक 2 मधून तुरुंग क्रमांक 5 मध्ये हलवण्यात आले आहे. मनीष सिसोदिया यांना तुरुंग क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना तुरुंग क्रमांक 7 मध्ये ठेवण्यात आले आहे. या कारागृहात ईडी आणि सीबीआयच्या कैद्यांना ठेवण्यात आले आहे.
२८ मार्चला ईडीने गोव्यातील आपच्या नेत्यांशी केजरीवालांची उलटतपासणी करायची असल्याचे कोर्टाला सांगितले होते. आज ईडीने केजरीवालांची चौकशी पूर्ण झाल्याचे कोर्टाला सांगितले. केजरीवालांनी वाचण्यासाठी उत्तरे दिली आहेत. यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात यावे अशी मागणी ईडीने केली होती. कोर्टामध्ये केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल, मंत्री गोपाल राय आणि आतिशी हजर होत्या.