MCD Result: इथेच घात होणार! केजरीवालांनी दिल्ली जिंकली, तरी प्रचंड मते गमावली; राज्याची निवडणूक लागली तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 02:17 PM2022-12-07T14:17:49+5:302022-12-07T14:19:07+5:30
मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळू लागले; आपने दिल्ली जिंकली तरी केजरीवालांना आकडे टेन्शन देणार...
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे आज निकाल समोर आले. यामध्ये एक्झिट पोलप्रमाणे आपनेभाजपाला १५ वर्षांच्या सत्तेतून बेदखल केले आहे. आप बहुमताने सत्तेत आली आहे. असे असले तरी भाजपाने आपला जबरदस्त टक्कर दिली आहे. दिल्ली जिंकली तरी आपला मतांच्या गणितात मार खावा लागला आहे. एवढा की उद्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभवदेखील पत्करावा लागू शकतो.
आपला दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत ४२ टक्के मते मिळाली आहेत. परंतू, विधानसभेला ५३.५७ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच आपने दोन वर्षांत आपने तब्बल ११ टक्के मते गमावली आहेत. आजचा विजय आपला जल्लोष करण्यासाठी पुरेसा असला तरी केजरीवालांना टेन्शन देण्यासाठी देखील पुरून उरणारा आहे.
निवडणूक आयोगानुसार आपला दिल्लीत 42.35 टक्के, भाजपाला 39.23 टक्के आणि काँग्रेसला 12.6 टक्के मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना 2.86 टक्के मते मिळाली. बसपाला 1.65 टक्के मते मिळाली. जर २०२० मध्ये झालेल्या विधानसभेचा विचार केला तर भाजपाने तेव्हा 38.51 टक्के मते आणि काँग्रेसने 4.26 टक्के मते मिळविली होती. दोन्ही निवडणुकांत मतदानाची टक्केवारी जवळपास समानच होती, मग आपची ११ टक्के मते गेली कुठे?
भाजपाला 0.72 टक्के मते जास्त मिळाली आहेत. तर काँग्रेसला 7.9 टक्के मते अधिक मिळाली आहेत. आपने भलेही जागांमध्ये भाजपाला मात दिलेली असली तरी मतांच्या गणितात तोटा झाला आहे. आणखी तीन वर्षांनी ही जादाची मते वाढली तर आपची सत्ता कमी अधिक फरकाने जाण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही.