राज्यांतील सरकारं पाडण्यासाठी मोदी सरकारच्या रथाला तीन घोडे; केजरीवालांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:58 PM2023-08-18T17:58:39+5:302023-08-18T17:59:59+5:30
"केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे."
केंद्र सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) या विधेयकाला रस्त्यापासून संसदेपर्यंत कडाडून विरोध केला. मात्र संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतरही, त्यासंदर्भात गदारोळ सुरूच आहे. आता दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात आप प्रमुख तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे. या रथाला ED, CBI आणि कॅश, हे तीन घोडे आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारवर हल्ला चढवताना केजरीवाल म्हणाले, या रथाच्या बळावर भाजपने 9 राज्यांतील सरकारे पाडली आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनाही 25-25 कोटींचे आमिष दाखवण्यात आले. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले. हे लोकही भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांनाही जामीन मिळेल. त्यांनी काहीही केलेले नाही. केजरीवाल पुढे म्हणाले, जेव्हा दिल्लीत भाजपचा रथ येऊन थांबला, तेव्हा हे विधेयक आणले गेले. एवढेच नाही, तर मोदी दिल्लीतील लोकांचा तिरस्कार करतात, असेही केजरीवाल म्हणाले.
'पूर्ण राज्याचा दर्जा' या मुद्द्यावर लढवली जाणार पुढची निवडणूक -
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक 'पूर्ण राज्याचा दर्जा' मिळवून देण्याच्या मुद्द्यावर लढली जाईल. केंद्र आणि नायब राज्यपालांवर निशाणा साधताना ते म्हणाले, जर आपल्याला (केंद्राला) वाटत असेल की, आपण नायब राज्यपालांच्या माध्यमाने देश चालवू, तर देशातील 140 कोटी जनता हे मॉडेल चालू देणार नाही. याचवेळी, आगामी लोकसभा निवडणूकही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर लढवली जाईल. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व सातही जागांवर पराभूत होईल, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.