केजरीवालांची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार
By देवेश फडके | Updated: January 28, 2021 13:18 IST2021-01-28T13:16:46+5:302021-01-28T13:18:21+5:30
आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे.

केजरीवालांची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार
नवी दिल्ली : दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्ष (आप) अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, गोवा येथील निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. या बैठकीत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, देशातील शेतकरी अडचणीत आहे, दुःखी आहे. गेल्या २५ वर्षांत तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नवीन केंद्रीय कृषी कायदे शेतीची वाट लावणारे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत घडलेला प्रकार निंदनीय आहे, असे केजरीवाल म्हणाले.
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामागे असलेल्या पक्षावर कठोर कारवाई झाली पाहिजे. एका सामान्य नागरिकाप्रमाणे शेतकऱ्यांचे समर्थन करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले. गेल्या ७० वर्षांत सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना, वारसांना नोकरी मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे मुद्दे अद्यापही निकाली लागलेले नाहीत, असे केजरीवाल यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्ली सोडल्यास गेल्या काही कालावधी झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला विशेष कामगिरी करता आलेली नाही. तरी आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला जनतेला दखल घ्यायला लावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असे सांगितले जात आहे.