'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:51 IST2024-12-12T13:51:17+5:302024-12-12T13:51:59+5:30
Arvind Kejriwal And AAP : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने दिल्लीतील महिलांना दिलेलं वचन आता पूर्ण केलं आहे.

'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने दिल्लीतीलमहिलांना दिलेलं वचन आता पूर्ण केलं आहे. केजरीवाल यांनी गुरुवारी 'महिला सन्मान योजने'ची घोषणा केली, या योजनेला सकाळी दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात याची घोषणा केली.
या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सरकार दरमहा एक हजार रुपये ट्रान्सफर करेल. एवढेच नाही तर अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीनंतर महिलांना १००० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याची मोठी घोषणा केली. उद्यापासून (१३ डिसेंबर) महिला या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.
दिल्ली सरकार ने आज अपना वादा पूरा किया। दिल्ली सरकार की कैबिनेट ने हर महीने महिलाओं को 1000 रुपये देने का प्रस्ताव पास किया। https://t.co/HBVssCOZmr
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 12, 2024
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, "आज मी दोन मोठ्या घोषणा करणार आहे आणि त्या दोन्ही दिल्लीच्या माता-भगिनींसाठी आहेत. आम्ही वचन दिलं होतं की, आम्ही दर महिन्याला महिलांच्या खात्यात १००० रुपये जमा करू. आज कॅबिनेटने ते मंजूर केलं आहे, यासाठी महिलांना रजिस्ट्रेशन करावं लागेल, एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या खात्यात हजार रुपये हे दर महिन्याला येतील."
"आम्ही गेल्या एप्रिलमध्ये याची सुरुवात करणार होतो, पण दुर्दैवाने या लोकांनी मला चुकीच्या प्रकरणात जेलमध्ये पाठवलं. मी ६-७ महिने जेलमध्ये राहिलो आणि बाहेर आल्यानंतर ही योजना राबवण्यासाठी आतिशी यांच्यासोबत काम करत होतो. आज आम्ही घोषणा करत आहोत. उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि नंतर पैसे दिले जातील" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.