ज्या मद्य घोटाळ्याचे अरविंद केजरीवालांवर आरोप, त्याच्या विक्रीतून दिल्ली सरकारला बंपर कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:45 PM2024-01-06T20:45:34+5:302024-01-06T20:46:51+5:30
Arvind Kejriwal : ज्या मद्य घोटाळ्यावरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येत आहे, त्याच्या माध्यमातूनच दिल्ली सरकार मालामाल होत असल्याची माहिती समोर येत आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्याच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आपच्या काही नेत्यांकडून केजरीवाल यांना ईडी अटक करेल, असा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात याआधी ईडीने मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. मात्र ज्या मद्य घोटाळ्यावरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येत आहे, त्याच्या माध्यमातूनच दिल्ली सरकार मालामाल होत असल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीमध्ये मद्याची अधिक दुकाने असल्याने आणि वेगवेगळ्या ब्रँड्सची उपलब्धता असल्याने मद्याच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे. दिल्ली सरकारच्या एक्साइज डिपार्टमेंटच्या महसुलामध्ये मागच्या आर्थिक वर्षामध्ये याच काळात गोळा झालेल्या महसुलापेक्षा ९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. एक्साईज डिपार्टमेंटने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान विविध मद्याची दुकानं आणि हॉटेल व रेस्टॉरंटच्या माध्यमातून झालेल्या मद्याच्या विक्रीमधून एक्साइज ड्युटी आणि व्हॅल्यू अॅडेड टॅक्सच्या माध्यमातून १८८९.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी याच काळात काळात या तिमाहीमध्ये मद्य विक्रीवरील एक्साइज ड्युटीमधून १७२५.६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एवढंच नाही तर नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील मद्य दुकानांवरून वेगवेगळ्या ब्रँडच्या ४८ कोटी रुपये किमतीच्या २४ लाख बाटल्यांची विक्री झाली. मद्याच्या बाटल्यांवरील एक्साइज ड्युटी आणि व्हॅल्यू अॅडेट टॅक्समधून होणारी कमाई हे दिल्ली सरकारच्या महसुलाचे माध्यम आहे. एक्साइज फीच्या माध्यमातून २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहींमध्ये दिल्ली सरकारने एकूण ५ हजार ४५३.६ कोटी रुपये गोळा केले आहेत.